अन्यथा कायदा हातात घेऊ – राजू शेट्टी
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन मधील वीजबिल माफ करावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने करण्यात आली. शासनाने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता केलेले नाही. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे या मागणीसाठी गेले सहा महिने कोल्हापुरात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दुपारी पंचगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते राजू शेट्टी आणि प्रताप होगाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
त्यामध्ये भाजपा वगळता जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, जनता दल सेक्युलर, आम आदमी पार्टी व अन्य विविध पक्ष व इतर सर्वपक्षीय संघटना, उद्योजक सहभागी झाले होते.
रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. पोलिसांनी बळाचा वापर करून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण, कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अर्ध्या तासानंतर ही आंदोलन सुरूच राहिले. आंदोलन ठिकाणी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा होता. सरकारने तातडीने वीज बिल माफ न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. जोपर्यंत विज बिल माफ केले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘लॉकडाऊन काळातील सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे म्हणून ऊर्जामंत्री यासह अनेक नेत्यांना भेटलो. पण अजुनही त्यावर निर्णय होत नाही. त्यामुळे आता कायदा हातात घेतल्याशिवाय पर्याय राहिला नाही. आम्ही कायदा हातात घेतला तर काय होते हे मुख्यमंत्र्यांना आणि सर्वच नेत्यांना माहीत आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा.’असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.