लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार निघाले गावाला!

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात कडक निर्बंध घालण्यात आले आहे. कडक नियम लागू केल्याने परप्रांतीय कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा लॉकडाऊन लागू झाल्यावर गेल्या वर्षीप्रमाणे त्रासाला सामोरे जावे लागू शकते या भीतीने कामगारांनी पुन्हा गावी जाण्यास सुरुवात केली आहे, तर गावावरून मुंबईत येण्याच्या बेतात असलेल्या कामगारांनी माघारी परतण्याचे नियोजन पुढे ढाकलेलं आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे विविध उद्योगात काम करत असणाऱ्या कामगारांमध्ये भीती पसरली आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून विविध शहराच्या विविध भागांतील कामगारांनी परतीची वाट धरली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इथल्या मजुरांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिल्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनन्स स्थानकात गेल्या आठवड्यात प्रवाशांची गर्दी उसळली होती. प्रवाशी सुटकेस व प्रवासी बॅगा घेऊन मोठ्या प्रमाणात स्थानकांत जमले होते.
दरम्यान, मागील वर्षी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर कामाअभावी अनेक मजुरांनी गावाकडचा रस्ता धरला. मुंबई- पुण्यातून लाखो मजूर त्यांच्या मुळ गावी परतले. तसंच, मजूरांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेसही सुरू करण्यात आली होती. मिशन बिगीन अगेन अंतर्गंत निर्बंध शिथिल केल्यानंतर व उद्योगधंदे सुरळीत सुरु झाल्यानंतर अनेक मजुर महाराष्ट्रात परतले होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्येनं पुन्हा उचल खालल्यानंतर व लॉकडाऊनच्या भीतीने मजुर आपापल्या गावी पुन्हा परतत असल्याची चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कोरोना स्थिती आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, “गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. आम्हाला यावेळी तसं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देऊ.”