Tuesday, October 4, 2022
HomeZP ते मंत्रालयसंधिसाधू, सत्तापिसासू किंवा म्हणा गद्दार, पण सोपे नाही होणे अब्दुल सत्तार...

संधिसाधू, सत्तापिसासू किंवा म्हणा गद्दार, पण सोपे नाही होणे अब्दुल सत्तार…

एकनाथ शिंदे यांनी बंड केले, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आता राज्याचा कारभार सुरु झाला आणि राजकीय अस्थिरताही शमली. या राजकीय घडामोडींमध्ये शहाजी बापू पाटील, दीपक केसरकर संजय शिरसाठ, संदीपान भुमरे यांप्रमाणेच अब्दुल सत्तार हे देखील कायम चर्चेत असतात..

कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सत्तार यांचे कुठले हिंदुत्व धोक्यात आले, अशी संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर सत्तार अधिकच चर्चेत आले. त्यांच्यावरही संधिसाधू, सत्तापिसासू आणि गद्दारीचा आरोप झाला. राजकीय टीकाकारांनी निशाना साधला. यामुळे अब्दुल सत्तार हे अधिकच दखलपात्र झाले.

सामान्य कुटुंबात जन्म

अब्दुल सत्तार यांचा जन्म १ जानेवारी १९६५ मध्ये सिल्लोडमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झालेले आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट हलाकीची असताना मोलमजुरी करून त्यांच्या वडिलाने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सांभाळ केला.

शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी अब्दुल सत्तार यांना देखील मोलमजुरी हमाली करावी लागली. पुढे त्यांनी सायकल दुकान सुरु करून घर चालवले.

शिक्षण

अब्दुल सत्तार यांचे शालेय शिक्षण सिल्लोडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत व माध्यमिक शिक्षण न्यू हायस्कूल या शाळेत पूर्ण झाले. पुढे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथेच त्यांचे नेतृत्व झळाळून निघाले.

माध्यमिक शाळेत मोनिटर असणारे सत्तार महाविद्यालयामध्ये वर्ग प्रतिनिधी (सी.आर.) ची निवडणूक लढवून पदाधिकारी झाले. इथूनच निवडणुका जिंकण्याचे कसब त्यांना जमले.

ग्रामपंचायत ते नगराध्यक्ष

माजी सहकार मंत्री माणिकराव पालोदकर यांचे कार्यकर्ते म्हणून अब्दुल सत्तार यांची ओळख होती. माणिकरावजी पालोदकर यांच्यासोबत काम करून त्यांनी राजकारणातले खाचखळगे अनुभवले.

पुढे सिल्लोड ग्रामपंचायतीचे ०१ जानेवारी १९९० रोजी नगरपरिषदेत रुपांतर झाले. आणि हा निर्णय सत्तरांच्या हिताचा ठरला. इथूनच त्यांनी झेप घ्यायला सुरुवात केली.

१९८४ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत यश आल्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत उडी घेतली. त्यावेळी चिट्ठी टाकून नगराध्यक्ष निवडला गेल्याने त्यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली.

मात्र, नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागली.

सत्तारांनी नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले पक्षातील अशोक सूर्यवंशी यांना सोबत घेवून कॉंग्रेस पक्षाच्या तीन नगरसेवकाच्या बळावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल व अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे आकर्षित करीत सिल्लोड नगरपरिषदेचे पहिल्या नगराध्यक्ष पदाचे पक्षाकडून उमेदवार म्हणून समोर येण्यास यश मिळविले.

मतदानाच्या वेळी शिवसेना – भाजप युतीच्या उमेदवारास आणि अब्दुल सत्तार यांना समान मते मिळाली. दोघांना समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून सिल्लोडचा पहिला नगराध्य्क्ष निवडण्यात आला आणि नशिबाच्या जोरावर अब्दुल सत्तारांची चिठ्ठी निघाली व त्यांनी सिल्लोडचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला.

वेगळी चूल –

नगराध्य्क्ष पद अत्यंत काटेरी मुकुट सांभाळताना ०९ ऑगस्ट १९९६ रोजी अब्दुल सत्तार यांच्यावर स्वपक्षातील असंतुष्टानी शिवसेना – भाजप युतीच्या मदतीने अविश्वास आणून व पारित करून घेतला आणि अब्दुल सत्तार यांना नागरपरीषदेतून पायउतार व्हावे लागले.

त्यामुळे सत्तार यांनी १९९९ साली सिल्लोड नगरपरिषद निवडणूकीत कॉंग्रेस पक्षात असतानाच आपली वेगळी चूल मांडत स्वबळावर समर्थकांना पक्षाची उमेदवारी मिळून दिली व बऱ्यापैकी यश मिळविले.

सिल्लोड ते मुंबई

सत्तार यांनी १९९९ साली कॉंग्रेस पक्षाकडून सिल्लोड विधानसभेसाठी उमेदवारीची जोरदार मागणी पक्षाकडे केली. जनमत पाठीशी असतांना देखील कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसल्याचा आरोप त्यांच्याकडून होतो.

पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर सिल्लोड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी टाकून झालेल्या चौरंगी लढतीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली.

विशेष म्हणजे या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. याची दाखल घेऊन कॉंग्रेस पक्षातील तत्कालीन नेतृत्व शंकरराव चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक हेरली.

तेव्हा ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ठोंबरे काका व पक्षाचे माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते अब्दुल सत्तार यांना कोंगेस पक्षात प्रवेश देण्यात आला.

चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांना नुसता पक्षातच प्रवेश दिला नाही तर २००१ साली स्थानिक स्वराज्य संथा मतदार संघातून विधानपरिषदेची उमेदवारी मिळवून दिली. पुढे सत्तार यांनी विधानपरिषद निवडणूक लढवली व जिंकली. शिवसेना उमेदवाराचा १५ मतांनी पराभव करत ते विधानपरिषदेत पोहोचले.

निसटता पराभव

कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांच्या कामाची पद्धत पाहून २००४ साली सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली मात्र स्वंपक्षातील अनेकजण विरोधात उभे राहिले व पक्षातील अनेकांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याने अब्दुल सत्तार यांचा निसटता ३०१ मतांनी पराभव झाला.

पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने पक्षाचे काम करत राहिले. जनसंपर्क वाढवीत पक्षाची ताकत वाढविली. कॉंग्रेस पक्षाने अब्दुल सत्तार यांना पुन्हा सत्तेची ताकत देण्यासाठी २००७ मध्ये विधान परिषदेची उमेद्वारी देऊन संधी मिळवून दिली.

परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीत सत्तेतील मित्र पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने अपक्ष उमेदवार मैदानात उतरवून अब्दुल सत्तार यांना शह देण्याचे कामे केले, असे सत्तार सांगतात.

अखेर विधानसभेत

२००९ साली त्यांना पक्षाने सिल्लोड विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली.याच दरम्यान एकाकाळाचे त्यांचे राजकीय नेतृत्व असलेले परंतु काही कारणास्तव १९९६ ते २००८ पर्यंत दूर गेलेले जी.प.माजी अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या सोबत त्यांचे राजकीय सुत जुळले.

त्यांच्या मदतीने अब्दुल सत्तार यांनी विधानसभेची निवडणूक मोठ्या फरकाने जवळपास ३० हजार मताधिक्याने जिंकली. पुढे अशोकराव चव्हाण यांनी त्यांना राज्यमंत्री पद दिले. पशुपालन, मत्स्यपालन आणि दुग्धव्यवसाय विकास या खात्याचे काम त्यांनी पहिले.

कॉंग्रेस शिवसेना व्हाया शिंदे गट

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तर यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाने सहकार्य केले नसल्याचा आरोप करत ते पक्षातून बाहेर पडले.

शिवसेनेच्या तिकिटावर ते पुन्हा सिल्लोड मधून निवडून आले. पुढे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. महसूल, ग्रामीण विकास, बंदरे, खार जमीन विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पहिले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांमध्ये ९ मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये मंत्र्यांमध्ये सत्तारांचा देखील सहभाग आहे. लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचे नवे मंत्रिमंडळ स्थापन होईल. ज्यामध्ये सत्तार यांना संधी मिळू शकते.

अधिक वाचा :

ठाकरेंच्या सामनाला उत्तर म्हणून राणेंनी ‘प्रहार’ची सुरुवात केली…

कायम बाळासाहेबांच्या सावलीत वावरलेले उद्धव ठाकरे शिवसेना पुन्हा उभी करून दाखवणार का?

२३ वर्षांच्या टवटवीत पोराला बाळासाहेब म्हणाले, ‘काय करतो ? विधानसभा लढतोस का ?’

राजा का बेटा अब राजा नही बनेगा, तर मग संतोष दानवे आमदार कसे काय?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments