…तरच वर्षाअखेरीस भारत कोरोनामुक्त! – डॉ. संजय ओक

मुंबई : कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त या त्रिसूत्रीच्या जोरावरच कोरोनाची दुसरी लाट परतवता येणे शक्य असल्याचे सांगितले. नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले आणि वेगाने लसीकरण केले तर आपण लवकर यामधून बाहेर पडू. एप्रिल महिन्यातील शेवटचे तीन दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या तीन दिवसांतील रुग्णसंख्येवर लॉकडाऊन आणखी किती काळ लांबेल, हे निश्चित होईल, असे संजय ओक यांनी म्हटले.
राज्यातील नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करुन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणला नाही तर महाराष्ट्रात दीर्घकाळ लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, अशी भीती डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलीये. यासाठी त्यांनी इंग्लंडचे उदाहरण दिले. इंग्लंडमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दुसरी लाट आल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. मला लोकांना घाबरावायचे नाही. मात्र, इंग्लंडमधला हा लॉकडाऊन ९२ दिवस लांबला होता. महाराष्ट्रावर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणला पाहिजे, असे मत संजय ओक यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारने सोमवारी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला होता. आता हे लसीकरण वेगाने झाले पाहिजे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत भारतामधील बहुसंख्य लोकसंख्येला लस मिळाली तर या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत कोरोनामुक्त होऊ शकतो, असा दावा डॉ. संजय ओक यांनी केला. मात्र, त्यासाठी वेगाने लसीकरण झाले पाहिजे. महाराष्ट्रात लसीकरणासाठी टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी नवी रणनीती आखली आहे. हा अहवाल आम्ही राज्य सरकारला सोपवल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्याप्रमाणावर स्वयंसेवकांचा सहभाग आवश्यक –
गेल्या वर्षभरापासून राज्यातील डॉक्टर्स आणि नर्सेस अविरतपणे काम करत आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेतील हे कर्मचारी पूर्णपणे थकले आहेत. नेहमीच्या रुग्णांवर उपचार करा, कोरोना रुग्णांकडे बघा आणि लसीकरणही करा, अशी तिहेरी जबाबदारी ते आता पेलू शकत नाहीत. लसीकरणाच्या मोहिमेत मोठ्याप्रमाणावर स्वयंसेवकांना सहभागी करून घ्यायला हवे. त्यासाठी NSS आणि इतर उपक्रमांतील स्वयंसेवकांची मदत घेतली जावी. हे स्वयंसेवक लसीकरण केंद्रांवर लॉजिस्टिक्सची संपूर्ण जबाबदारी सांभाळतील. आम्ही त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षण देऊ. तर लस देण्याचे काम हे आरोग्य कर्मचारी पार पाडतील, असा प्रस्ताव डॉ. संजय ओक यांनी मांडला.