आता घरीही मास्क घालायची वेळ आली आहे

दिल्ली : देशात सातत्याने कोरोना बाधित आढळून येत आहे. याबाबत केंद्र सरकारने नागरिकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. आता आपल्या घरात कुटुंबीयांसोबत असतानाही मास्क वापरण्याची वेळ आली आहे, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.
ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पॉल म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका. आता तर कुटुंबीयांसोबत असतानाही मास्क वापरण्याची वेळ आली आहे. मास्क लावणे खूप महत्वाचे आहे. लोकांना घरी बोलवू नका. आम्ही अशा कोरोनाच्या वाढत्या काळात लसीकरणाची गती कमी होऊ देणारं नाही. उलट लसीकरण वाढविणे गरजेचे आहे.
बरेच जण कोरोना झाल्याने रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. लोकांनी घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल होण्याचा आवाहनही सरकारने केले आहे. याचबरोबर ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरही औषध जी कोविडच्या रुग्णासाठी महत्वाची आहेत, त्याचा वापर योग्य प्रकारे व्हावा यावरही सरकारने भर दिला आहे.
केंद्र सरकारने केलेल्या संशोधननुसार फिजिकल डीस्टनसिंगचे पालन केले नाही तर एक व्यक्ती ३० दिवसांमध्ये ४०६ जणांना बाधित करू शकतो. जर फिजिकल डीस्टनसिंग ५० टक्यांनी कमी झाले तर १ जण ३० दिवसात केवळ १५ लोकांना बाधित करू शकतो. त्याचे हेच प्रमाण ७५ टक्यांनी कमी झाले तर एक जण ३० दिवसात सुमारे ३ जणांनाच बाधा करू शकतो.
सध्या भारताकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा आहे. पण ते रुग्णालयापर्यंत कसा पोहचवायचे आहे हा प्रश्न आहे. पण ऑक्सिजन साठी नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही ते पोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे पॉल यांनी सांगितले.