भारताच्या शेवटच्या बादशहाची ‘कबर’ कुणालाच ठाऊक नाही?

No one knows the 'grave' of the last emperor of India.
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

मुघलांची सत्ता हा भारतीय इतिहासामधील एक अविभाज्य घटक मानला जातो. मुघलांनी भारतामध्ये अनेक वर्ष, अगदी ब्रिटीश भारतामध्ये येईपर्यंत आपली सत्ता कायम ठेवली होती. कालांतराने इंग्रज भारतात आले आणि त्यांनी मुघल साम्राज्य संपवून भारतात स्वतःची सत्ता निर्माण केली. इतिहासामधील अत्यंत महत्त्वाचा घटक असणारे मुघल, या मुघल साम्राज्याचा अंत कसा झाला? या मुघलांचा शेवटचा शासक म्हणजेच बहादूर शाह जफरचा शेवट कसा झाला? आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत.

अबू जफर सिराजुद्दिन मुहम्मद बहादुरशहा म्हणजेच बहादुर शाह जफर. भारताचा १९ वा आणि शेवटचा मुघलसम्राट. तैमुर घराण्यातील हा अखेरचा राज्यकर्ता. मिर्झा गालिब हे या साम्राटच्या राज दरबारातील एक महत्वाचे दरबारी होते. सम्राट स्वतः एक कवी असल्याने त्यांनी मिर्झा गालिब यांना त्यांचे कवी शिक्षक म्हणून नेमलं होतं.त्यांच्या कारकिर्दीत संगीत आणि साहित्य कलेला जास्त महत्व दिलं गेलं. १८५० मध्ये, सम्राट बहादूर शाह जफर यांनी मीर्झा गालिब यांना ‘दबीर-उल-मुल्क’ हि पदवी दिली. ही पदवी मिळणं म्हणजे मिर्झा गालिब यांनी दिल्लीच्या खानदानित प्रवेश केल्याचं प्रतिक आहे. साम्राटाकडून त्यांना ‘मिरज नोशाहि’ पदवी देखील मिळाली, त्यामुळे मिर्झा हे त्यांचे पहिले नाव झाले.

बहादूरशहा जफरला दुसरा बहादुरशाह म्हणूनही ओळखलं जातं. मुघल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू रजपूत पत्नी लालबाई या दाम्पत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर १८ सप्टेंबर १८३७ मध्ये बहादुरशाह दिल्लीच्या सिंहासनावर विराजमान झाला. तो उत्तम राज्यकर्ता होता. त्याने अनेक सुधारणा केल्या व लोककल्याणकारी प्रशासन राबविले. प्रजाजनांसाठी महत्त्वपूर्ण आदेश काढले. त्यामध्ये गो हत्याबंदीचा महत्त्वपूर्ण आदेशही होता. धर्मनिरपेक्ष भावनेने राज्यकारभार करण्यात भारताच्या इतिहासातील बहादूरशहा जफरचे स्थान मोठे आहे. उत्तम राजकीय नेता, कवी व गझलकार म्हणून त्याची ख्याती होती. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातही त्याचे मोठे योगदान होते.

भारतामध्ये १८५७ चा उठाव सुरू झाला. ११ मे १८५७ रोजी मेरठमधून सैनिक दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचले. इंग्रज अधिकारी जेम्स डग्लसचा भारतीय सैनिकांनी पराभव केला. दुसऱ्याच दिवशी बहादुरशाह व भारतीय सैनिकांनी लाल किल्ल्यावर मोठ्या धामधुमीत विजयोत्सव साजरा केला. त्यावेळी बहादुरशाह दिल्लीचा नवाब होता. बंडवाल्यांनी बहादुरशाहलाच भारताचा सम्राट म्हणून घोषित केले. नानासाहेब पेशवे यांनी बहादूरशहाला स्वातंत्र्ययुद्धाचा नेता म्हणून भेटवस्तू पाठवून आपला पाठिंबा दर्शवला. मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी, पंजाबच्या रणजितसिंह राजाची पत्नी यांनीही त्याला पाठिंबा दिला.

एक-एक करत इंग्रजांनी भारतातील सर्व संस्थाने खालसा केली, तनखे रद्द केल्याने सर्वत्र असंतोष पसरला होता. संस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातामध्ये सर्व सत्ता होती. जाहीरनामे मात्र बहादुरशाहच्या नावे प्रसारित होत असत. कालांतराने कंपनी सरकार व भारतीय सैनिक यांमधील संघर्ष वाढत गेला. बहादुरशाह ज्या वेळेस ब्रिटिशांच्या विरोधात लढत होते, तेव्हा त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. १८५७ च्या उठावामध्ये सामील होण्यासाठी त्यांनी जयपूर, उदयपूर, जोधपूर, इंदूर, ग्वाल्हेर या स्थानिकांशी पत्रव्यवहार करून आपण सर्व भारतीय एकत्र येऊन इंग्रजांना भारतातून हाकलून देऊया, असे आव्हान केले होते परंतु राजपूत संस्थानिकांनी त्यांना सहकार्य केलं नाही. नंतर मात्र ताकदवान इंग्रजांपुढे मुघल टिकले नाहीत. बहादुरशाहचा पराभव झाला. पराभवानंतरही भारतीय जनता बहादुरशाहलाच भारताचा सम्राट मानत होती.

इंग्रजांनी बहादूरशहाला जेरीस आणले होते. उठाव सुरू असतानाच तो आपली तीन मुले व नातवंडांसह दिल्लीच्या हुमायूनच्या मकबऱ्याध्ये आश्रयास गेला. मिर्झा इलाही बख्तने विश्वासघात केला आणि इंग्रज सैन्याने मेजर हडसनच्या नेतृत्वाखाली १४ सप्टेंबर १८५७ ला बहादुरशाहला पकडले. पुत्र मिर्झा मुघल, मिर्झा खिज्र सुलतान आणि नातू अबू बख्त यांना पकडून ठार करण्यात आले. इतर २१ शाहजाद्यांना पकडून फाशी देण्यात आले. बहादुरशाहवर जानेवारी १८५८ मध्ये यूरोपियन लोकांची कत्तल केल्याच्या आरोप ठेवून त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

ब्रिगेडियर जसबीर सिंग यांनी त्यांच्या ‘कॉम्बॅट डायरी: ॲन इल्युस्ट्रेटेड हिस्ट्री ऑफ ऑपरेशन्स फॉर फोर्थ बटालियन, कुमाऊं रेजिमेंट १७८८ ते १९७४’ या पुस्तकात लिहिले आहे की, कैदेत असतानाच पाच वर्षानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. बहादूर शाह जफरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचदिवशी संध्याकाळी ४ वाजता ८७ वर्षाच्या या मुघल शासकाला रंगूनमध्येच दफन करण्यात आलं होतं. त्याला तिथे दफन केल्यानंतर त्या कबरीची कसलीही निशाणी अथवा खूण ठेवली नाही. आता यामागे त्यांचा काय हेतू होता याबद्दल कुठेही माहिती आढळून आलेली नाही. याचबाबत १९०५ मध्ये मुघल बादशाहच्या कबरीची ओळख आणि तिला सन्मान देण्यासाठी रंगूनमध्ये मुस्लिम समुदयाने आंदोलन सुरू केले. कितीतरी महिन्यांपर्यंत निदर्शने चालू राहिली, त्यानंतर वर्ष १९०७ मध्ये ब्रिटीश प्रशासनाने या गोष्टीला परवानगी दिली आणि बहादूर शाह जफरच्या कबरीवर दगड लावण्यात आले. त्या दगडावर ‘बहादूर शाह दिल्लीचे पूर्व बादशाह, रंगूनमध्ये ७ नोव्हेंबर १८६२ मध्ये मृत्यू, या जागेच्या जवळपास दफन करण्यात आले होते’ असं लिहीण्यात आलं. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारमध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी गेले होते. त्यावेळी ते अंतिम मुघल शासक असलेल्या बहादूर शाह जफरच्या मजारवर गेले होते. मोदी जिथे गेले तिथेच बहादूरशहाची कबर आहे का? अशा प्रकारचे प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आले होते. बहादूर शाह जफर या शेवटच्या मुघल शासकाचा अंत झाला पण त्याची कबर नक्की कुठे आहे, हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे भारताच्या शेवटच्या बादशहाची ‘कबर’ कुणालाच ठाऊक नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *