संचारबंदी नको; विनाकारण फिरणाऱ्यावर लाठीचार्ज न करता, गुन्हे दाखल करा-गिरीश बापट

पुणे : शहरात कोरोना बाधितांची साख्या वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवस मिनी लॉकडाऊनबद्दल माहिती दिली. पुणे शहरात पुढील सात दिवस हॉटेल, बार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मॉल, सिनेमागृह बंद राहणार आहे. मात्र, हॉटेल आणि बस बंदला भाजपच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला.
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका मांडली. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या काही निर्बंधना विरोध असल्याचे बापट यांनी सांगितले. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लाठीचार्ज न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. शहराची सार्जनिक वाहतूक व्यवस्था असणाऱ्या पीएमपीएलची सेवा बंद ठेवण्यास भाजपचा विरोध असल्याचे बापट यांनी सांगितले. बस बंद झाली तर कामगार वर्ग कसा जाणार? असा प्रश्न उपस्थित करत बस बंद ऐवजी ४० टक्के क्षमतेने चालविण्यात यावे असेही बापट यांनी सांगितले. तसेच हॉटेल बंद करण्या ऐवजी उभे राहून खाण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. त्याच बरोबर संचारबंदी नको तर जमावबंदी असावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. शिस्त पाळून समाजजीवन सुरळीत सुरु राहायला हवे. लोकांना रेशन द्या अशी मागणी करत खासदार गिरीश बापट यांनी काही द्यायचे नाही आणि नियम लावायचे याला काही अर्थ नाही अशी टिका बापट केली.