Tuesday, October 4, 2022
Homeविश्लेषणात्मक तडकाआठव्यांदा मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार ; सत्तापिसासू की गेमचेंजर ?

आठव्यांदा मुख्यमंत्री झालेले नितीश कुमार ; सत्तापिसासू की गेमचेंजर ?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यापासुन तब्बल चाळीस दिवस खोळंबलेला महाराष्ट्र सरकारचा मंत्री मंडळ विस्तार अखेर काल पार पडला. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबतची अंतिम सुनावणी आणखी बाकी आहे, त्या सुनावणी नंतर शिंदे- फडणवीस सरकार कायदेशीर की बेकायदेशीररित्या याचा फैसला होणार आहे.

मात्र, तूर्त राज्यातील राजकारणात कसलीही उलाथापालथ होताना दिसत नाही.

तर दुसरीकडे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा ‘रंग’ बदलले आहेत. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत त्यांनी राष्ट्रीय जनता दल व कॉंग्रेससोबत नवा सत्तेचा डाव मांडला आहे. नितीश कुमार व राजदचे अध्यक्ष तेजस्वी यादव अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

सत्तेच्या गणितात नितीश बाबू मास्टर!

काल ( मंगळवारी ) नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदर चार दिवसंपुर्वीच्या घटनांकडे पहिले तर बिहारच्या राजकारणात कसलीही उलाथापालथ सुरु नव्हती. सरकार स्थिरपणे चालू होते.

पण भाजप आपल्याला कमजोर करत असल्याचा आरोप करत नितीश बाबूंनी पुन्हा एकदा पलटी मारण्याचे ठरवले. काल जेडीयुची एक बैठक पार पडली. त्यानंतर नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्यावर ठाम असल्याचे कळताच भाजपच्या १६ मंत्र्यांनी राजीनामे देत पाठींबा काढून घेतला.

जेडीयुच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी माजी मुख्यमंत्री राबडादेवी यांच्या निवासस्थानी गेले. तिथे सर्व डाव्या पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना समर्थन देत असल्याचे पत्र दिले. त्यांनतर नितीश कुमार यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली.

पलटीमार नितीश बाबू

नितीश कुमार २००० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. पण त्यांचा कार्यकाल अल्प ठरला. पुढे २००५ मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. २०१० मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत बिहारचा कारभार पहिला. तिसरी टर्म सुरु असतानाच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

झाले असे की, २०१३ ला नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करताच या निर्णयाचा विरोध करत नितीश कुमार यांनी जेडीयू एनडीएमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले. व राजद सोबत जाऊन नवे सरकार स्थापन केले.

पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे जेडीयूचे पानिपत झाले. या पराभवाची जबाबदारी घेत नितीश कुमार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे थोड्याच दिवसांनी त्यांनी परत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

२०१५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजद सोबत युती करून विधानसभा निवडणूक जिंकत पाचव्यांदा मुख्यमंत्री पद मिळविले. मात्र, दोनच वर्षात नितीश कुमार यांनी डाव्या पक्षांची साथ सोडत पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्यांना सहाव्यांदा मुख्यमंत्री होता आले.

त्यानंतर २०२० ची विधानसभा निवडणुक भाजपसोबत लढवून पुन्हा एकदा सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांनी भाजपपासून फारकत घेतली असून आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनण्याचा रेकॉड केला आहे.

सत्तापिसासू की गेमचेंजर ?

९ वर्षात दुसर्यांदा भाजपपासून काडीमोड करत पुन्हा महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. २०१३ मध्ये एनडीएमधून बाहेर पडल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश बाबूंना मोठा फटका बसला.

नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच एक वर्षात त्यांनी पुन्हा भाजपसोबत जुळवून घेतले. त्यावेळी भाजपविरोधी राजकारणाला वाव नव्हता म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

२०२० नंतर नितीश बाबू हे भाजपच्या पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री झाले होते. मात्र, बिहारमध्ये भाजपची पकड अधिकच घट्ट होत असल्याने नितीश बाबूंना धास्ती बसली आहे. त्यातच २०२० च्या विधानभा निवडणुकीनंतर तेजस्वी यादव हे प्रमुख विरोधी नेते म्हणून उदयास आलेले आहेत.

लालूप्रसाद यादव जेलमध्ये असतानाही त्यांनी भाजप आणि नितीश कुमार यांना टक्कर देत अस्तित्व टिकवून ठेवले. तेजस्वी यादव यांचा उदय हा देखील नितीश बाबूंना मारक ठरल्याचे मागील निवडणुकीत दिसून आले.

भाजप आणि राजद या दोन्ही पक्षांची भरभराट व जेडीयूला लागलेली उतरती कळा, याचा विचार करूनच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे, असे म्हणावे लागेल.

पक्षहित आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची हेच अजेंड्यावर ठेवून नितीश कुमार वाटचाल करत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच भाजपशी अंतर्गत लढाई करण्यापेक्षा खुलेआम दोन हात करून भाजपसोबत लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

मात्र, नितीश कुमार यांच्या बदलत्या भूमिका आणि त्यांना मिळत असलेले यश पाहता बिहारच्या राजकारणातुन ‘तत्व’ हा मुद्दा नामशेष होत चाललाय की काय ? हा प्रश्न उद्भवतो.

अधिक वाचा :

सरकारविरोधी संघर्षात सातत्याचा अभाव, प्रियंका ११ महिन्यांनी रस्त्यावर अवतरल्या!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments