Sunday, September 25, 2022
Homeसंसदेच्या गॅलरीतूनना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय...

ना यशवंतराव पंतप्रधान झाले ना त्यांचे मानसपुत्र ; महाराष्ट्राच्या मातीत दोष काय ??

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून आपले पूर्णतः राजकारण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. यशवंतरावांच्या बोटाला धरून शरद पवारांनी दिल्ली गाजविली. तसेच यशवंतरावांनी शरद पवारांना आपले मानसपुत्र मानले होते.

त्यामुळे यशवंतरावांच्या जाण्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे पहिले गेले. तसेच शरद पवार देखील यशवंतरावांचे वारस म्हणून स्वतला सिद्ध करू शकल्याने यशवंतरावांनंतर दिल्ली गाजविणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा राजकारणी शरद पावरांना मानले जाते.

वेळप्रसंगी राजकीय कारकीर्द पणाला लागली तरी व्यवहारदृष्ट्या पुरोगामित्व जपणारे नेते म्हणून यशवंतरावांना ओळखले जाते. त्यांनाच गुरुस्थानी मानून पवारांनी राजकारणाचे धडे गिरविले. त्यामुळे यशवंतरावांनंतर पवारांचेच नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकीत पवारांचे नेतृत्व फुलले. शिक्षण घेत असताना त्यांनी पुण्यात शिक्षण घेणाऱ्या बारामतीच्या विद्यार्थ्यांचे संघटन केले. विद्यार्थी कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस आणि पुढे कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांनी सक्रीय राजकारणाला सुरुवात केली.

२७ व्या वर्षी आमदार होत शरद पवारांनी आपली संसदीय कारकीर्द सुरु केली. २९ व्या वर्षी राज्यमंत्री, ३१ व्या वर्षी कॅबिनेट मंत्री, ३८ व्या वर्षी राज्याचा मुख्यमंत्री असा प्रवास करून पवारांनी पुढे देशाच्या संरक्षण मंत्री पदाची धुरा सांभाळली.

यशवंतराव आणि पवार गुरु – शिष्याचे नाते

शरद पवारांची राजकीय कारकीर्द वयाच्या १६ व्या वर्षी सुरु झाली. त्याला निमित्त ठरले, गोवा स्वातंत्र्य लढा. १९५५ च्या आसपास पुर्तुगीजांपासून गोव्याला स्वातंत्र्य मिळावे, ही मागणी जोर धरत होती. त्याकरिता ठिकठिकाणी निदर्शने सुरु होती.

बारामतीमध्ये देखील अशीच निदर्शने सुरु असताना पवारांनी त्यात सहभाग घेतला. निदर्शनाचा भाग म्हणून त्यांनी आपली शाळा बंद ठेवली. तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना एकत्र करून पवारांनी मोर्चा काढला. या घटनेनंतर युथ कॉंग्रेस बारामतीचे ते सक्रीय सदस्य बनले.

तारुण्याच्या सुरुवातीपासूनच पवार कॉंग्रेससोबत जोडले गेल्याने त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांच्या मोठा प्रभाव होता. यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याशी अनेकदा भेटण्याची संधी पवारांना मिळाली.

एकदा झाले असे की, पवारांनी आपल्या कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी यशवंतरावांना आमंत्रित केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवारांची यशवंतरावांशी चर्चा झाली. त्यातून पवारांचे उत्साही व्यक्तिमत्व यशवंतरावांना भावले. तेव्हाच त्यांनी पवारांना सक्रीयपणे कॉंग्रेसचे काम करण्यास सांगितले.

राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देणारे नेतृत्व म्हणून यशवंतरावांना ओळखले जायचे, पवारांनाही त्यांनीच प्रोत्साहन दिले.

शरद पवार आमदार झाले, यशवंतरावांमुळे

१९६३ मध्ये शरद पवार यांची महाराष्ट्र युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनतर संघटना विस्तारासाठी पवारांनी चांगलीच मेहनत घेतली. याचे फळ त्यांना १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत मिळाले.

बारामतीतून विधानसभा निवडणुक लढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण स्थानिक कॉंग्रेस कमिटीने पवारांच्या नावाला जोरदार विरोध केला. त्यानंतर पवारांचे गुरु असणाऱ्या यशवंतरावांनी स्थानिक कॉंग्रेस नेत्यांच्या विरोध मोडीत काढून पवारांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा केला.

यशवंतरावांनी स्थानिक नेत्यांना गप्प करून शरद पवारांना उमेदवारी दिली. पण यामुळे स्थानिक कॉंग्रेस कमिटीतील नेते नाराज झाले आणि कमिटीतील टीमने राजीनामे दिले. उमेदवारीबाबत यशवंतरावांनी केलेला हस्तक्षेप हेच स्थानिक नेत्यांच्या नाराजीचे कारण होते.

मात्र, तरीही ३५ मतांनी शरद पवार विजयी झाले. तर त्यांचे विरोधी उमेदवार केवळ १७ हजार मते मिळवू शकले.

मंत्र्यांच्या यादीत शरद पवारांचे नाव

पुढे १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी दुसर्यांदा विजय मिळविला. यावेळी त्यांनी ५० हजार मते घेऊन विजय मिळविला. दुसर्यांदा विजय मिळाल्यावर पवारांना मंत्री पदाची आशा लागली.

पण मंत्री पदाच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. यामुळे ते पुरते संतापले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाखातर एक नवीन यादी बनविली गेली. ज्यात ‘शरद पवार’ हे नाव होते. पुढे इंदिरा गांधी यांच्या संमतीनंतर या यादीवर शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे पवारांना गृह आणि प्रशासन हे अतिशय महत्वाचे असे खाते मिळाले होते.

गुरु-शिष्याच्या नात्यातील विरोधाभास

आणीबाणी नंतरच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले. इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या पराभवाने गांधी घराण्याच्या अस्तित्वाला नख लागले. तर लोकदलाने २९५ जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठला.

पुढे २४ मार्च १९७७ दिवशी विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेत आले. समाजवादी, जनसंघ, संघटना काँग्रेस आणि स्वतंत्र पक्षाच्या उमेदवारांनी भारतीय लोकदलाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असल्याने या सर्व पक्षांनी ‘जनता पक्ष’ स्थापन करून यामध्ये स्व:ताला सामावून घेतले.

जनता पक्षाच्या रूपाने भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगरकॉंग्रेसी सरकार सत्तेत आले. मोरारजी देसाई हे पंतप्रधान तर जगजीवन उपपंतप्रधान झाले.

यावेळी लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची माळ पडली ती यशवंतराव चव्हाण यांच्या गळ्यात.

जनता पक्षाचे सरकारच्या कार्यकाळात म्हणजे १९७७-७८ यशवंतरावांनी विरोधी पक्षनेते पद सांभाळले. पण त्याचवेळी यशवंतरावांच्या शिष्याने राज्यात जनता दलासोबत सरकार स्थापन केले.

१९७८ सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी ४० आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पवारांसोबत सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.

वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांनी जनता दलाच्या पाठींब्यावर मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळविली. एकीकडे यशवंतराव जनता दलाच्या विरोधात होते. तर दुसरीकडे पवार जनता दलासोबत सत्तेत सहभागी झाले.

पुलोद आघाडी आणि श्रींची इच्छा

वसंतदादांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्यामुळे वसंतदादांना सरकार चालविणे कठीण चालले जात होते. त्यानंतर तिरपुडे यांच्यामुळे येत असलेल्या अडचणींबद्दल वसंतदादांनी यशवंतरावांना सांगितले. त्यांनतर पवारांनी सरकार पाडण्याची बीजं रोवली गेल्याचे बोलले जाते.

त्यामुळे पवारांच्या कृतीला यशवंतरावांची छुपा पाठींबा असल्याचे बोलले गेले. त्यावर जेष्ठ संपादक गोविंदराव तळवलकर यांनी ‘हे सरकार पडावे ही श्रींची इच्छा’ असा अग्रलेख लिहित पवारांना यशवंतरावांचा पाठींबा असल्याचे अधोरेखित केले.

मात्र, वसंतदादांच्या सरकारमधून शरद पवार बाहेर पडत असल्याची बातमी यशवंतरावांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी पवारांना रोखण्याचा प्रयत्न केला, असेही सांगितले जाते. पवारांना यशवंतरावांचा छुपा पाठींबा नव्हता असे गृहीत धरले तर शिष्याने गुरूचा आदेश मोडला असे म्हणावे लागेल.

यशवंतराव आणि शरदराव यांच्यातील एक साम्य

३८ व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर पवारांनी मागे वळून पहिले नाही. पुलोद सरकार बरखास्त झाल्यापासून पुन्हा कॉंग्रेसमध्ये जाण्यापर्यंतच्या काळ हा पवारांसाठी कठीण गेला. मात्र, राजीव गांधी यांच्या नेतृवात त्यांनी पुन्हा भरारी घेतली.

९० चे दशकानंतर पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पवारांचे नेतृत्व उदयास आले. त्यांच्या रूपाने एक मराठी माणूस पंतप्रधानपदी बसला असता, पण नियतीला औरच काही मान्य होते.

१९६२ मध्ये यशवंतरावांनी मुख्यमंत्री पद सोडून संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे उपपंतप्रधान पदाची जबाबदारी आली. त्यानंतर त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पहिले जायचे.

मात्र, यशवंतरावांना पण पंतप्रधान पदाने हुलकावणी दिली. यशवंतराव पंतप्रधान झाले नाहीत; तसेच शरद पवारांचेही झाले. गुरु-शिष्यांनी दिली गाजवली पण काबीज करता आली नाही. यशवंतराव आणि शरदराव यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे दोघांनाही देशाचे कारभारी होता आले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments