नेहरूंनी खरंच स्वतः ला भारतरत्न दिला होता का?

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

सध्या सोशल मीडिया वर तसेच ट्विटर वर #नरेंद्र_मोदी_स्टेडियम, #नरेन्द्र_मोदी_स्टेडियम_मोटेरा असे हॅशटॅग ट्विटरवर चर्चेत आहेत.  त्याचवेळी #सरदार_पटेल_का_अपमान हा हॅशटॅगही चर्चेत आहे. तुम्हाला एव्हाना कल्पना आली असेल कि आम्ही कोणत्या विषयांबाबत बोलत आहोत. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम जे कि, गुजरातच्या मोटेरा येथे आहे त्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम असं होतं आता त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. या नामकरणावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दीक वाद सुरु झाला आहे. नव्याने पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्टेडियमचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले.याचे स्वरूप थोडक्यात असे असणार आहे कि, नरेंद्र मोदी स्टेडियम हे सरदार पटेल स्पोटर्स एनक्लेव्हमध्ये असणार आहे. स्टेडियमभोवती हे एनक्लेव्ह उभे राहणार आहे. त्यात इतर खेळांच्याप्रकारांसाठी सुद्धा सुविधा असणार आहेत. .

आता मोदी पंतप्रधान असतांनाच स्टेडियमला मोदींचे नाव देण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच काँग्रेसने टीका करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख केला आहे. खासदार शशी थरुर यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे कि, “भाजपाच्या मातृ संघटनेवर बहिष्कार घालणाऱ्या गृहमंत्र्यांच्या नावाने हे स्टेडियम असल्याचे आता त्यांच्या लक्षात आले असावे, किंवा ट्रम्प यांच्याप्रमाणे दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे इथे आदिरातिथ्य करण्यासाठी ही अ‍ॅडव्हान्स बुकिंग असावी”.

तसेच हार्दिक पटेल यांनीदेखील मोदींवर टीका करत ट्विट केले कि, “अहमदाबादमध्ये असलेल्या जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. हा सरदार पटेलांचा अपमान नाही? सरदार पटेलांच्या नावावर मत मागणारी भाजपा आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेलांचा अपमान सहन करणार नाही”  तर याला प्रत्युत्तर देत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ट्विट केले कि, “सरदार पटेलांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी सोनिया गांधी आणि अन्य नेत्यांनी केवडीयाला कधी भेटही दिली नाही. आणि आता ते सरदार पटेलांचा अपमान झाला म्हणून बोलत आहेत.”

पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्टेडियमच्या मैदानावर  भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना  झाला आहे. परंतु हा सामना सुरु होण्याआधीच या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याची बातमी समोर आली आणि अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर तसेच ट्विटरवरही या स्टेडियमचीच चर्चा आहे. भाजपसमर्थक आणि काँग्रेससमर्थक यांचा ट्विटर वॉर सध्या ट्रेंड मध्ये आहे. मात्र हा वॉर चालू असतांना भाजपासमर्थकांद्वारे एक जुना मुद्दा वारंवार वापरला जात आहे. तो म्हणजे मोदींनी स्वतःचे नाव या स्टेडियम ला दिले तर काय वाईट आहे,भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांनीही स्वत:लाच भारतरत्न दिला होता असा युक्तिवाद केला होता. आता हा युक्तिवाद खरा कि खोटा हा प्रश्न सर्वांनाच पडला असणार आहे.

नेहरूंचे स्वातंत्र्यलढ्यातील, संसदीय लोकशाहीचे यशस्वी कार्य  व राज्यघटनेवर आधारीत राज्यपद्धती निर्मितीतील, देशातील विविध उच्चशिक्षण संस्था, विज्ञानतंत्रज्ञान या क्षेत्रातील योगदान मोठे आहे. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. नेहरू हे जन्मताच एक ‘रत्न; असल्याचं महात्मा गांधी आणि गुरूदेव टागोरांनी अनेक वेळा म्हटलं होतं. “Only, I know How much he toiled himself for freedom of India” अशा शब्दात सरदार पटेलांनी त्यांच्या नेहरूप्रति आपल्या भावना व्यक्त होत्या. आणि हेही तितकेच खरे आहे कि,नेहरूंना भारतरत्न द्यावा अशी अनेक नेत्यांनी खूप अगोदर मागणी केली होती मात्र महत्वाची बाब म्हणजे त्यापुर्वी म्हणजे १९५० सालापासून १९५५ साला पर्यंत नेहरूंचे नोबेल पुरस्कारासाठी तब्बल अकरा वेळा नामांकन केले गेले होते. आणि हे नामांकन करण्यात अनेक विद्वानांनी, शास्त्रज्ञांनी आणि नोबेल विजेत्यांनी तसेच माउंटबॅटन यांनी देखील पुढाकार घेतला होता. मात्र हा सन्मान घेण्यास नेहरूंनी स्वतः नकार दिला होता.

जवाहरलाल नेहरू भारतरत्न हा सन्मान मिळण्यास नक्कीच पात्र होते. नेहरूंनी स्वातंत्र्यलढ्यात नऊ वर्षापेक्षा जास्त कालावधी तुरुंगात घालवला, बरं त्यांचे योगदान फक्त तुरुंगात जाण्याइतकेच मर्यादित नव्हते. वास्तविक नेहरूंनी स्वत:ला भारतरत्न देण्यात यावा अशी शिफारस वा मागणी केंव्हाही केलेली नाही. तसेच असल्या काही  शिफारसीची कोणत्याही दस्ताऐवजात, कोणाच्या पत्रात, डायरीत अथवा अगदी कोणाच्या आठवणीतही याची नोंद नाही.

भारतरत्न हा सन्मान जानेवारी १९५४ पासून सुरू करण्यात आला व नियमाप्रमाणे नेहरूंच्या शिफारशीनुसार पहिल्या वर्षी हा सन्मान सी.राजगोपालचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन व सी.व्ही.रमण यांना दिला गेला होता. ज्यावेळी भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात झाली तेव्हा पंतप्रधान त्यांच्याकडून ज्या व्यक्तींना हा पुरस्कार द्यायचा आहे त्यांची नाव राष्ट्रपतींना कळवायचे आणि त्यानुसार हा पुरस्कार दिला जायचा अशी एकंदरीत पद्धत होती. पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाने सुचवलेल्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जायचा. नेहरूंना भारतरत्न हा सन्मान जाहीर करण्यात आला तेंव्हा ते रशियाच्या दौ-यावर होते. आणि नंतर नेहरूंना १५ जुलै १९५५ रोजी भारतरत्न हा सन्मान तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी प्रदान केला होता.

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादांनी नेहरूंच्या नावाची या सन्मानासाठी कोणीही शिफारस केलेली नसताना, स्वत:हून हा सन्मान नेहरूंना देण्याचे ठरवले होते. विशेष म्हणजे नेहरूंचे व राजेंद्रप्रसाद यांचे अनेक मुद्दयांवर वैचारिक मतभेद होते. त्या दरम्यान राष्ट्रपतींनी एका विशेष मेजवानीच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रपती भवनामध्ये केलं होतं. याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरु यांना भारतरत्न देण्याचा निर्णय जाहीर केला. टाइम्स ऑफ इंडियाने १६ जुलै १९५५ रोजी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे कि, नेहरु हे त्या काळातील शांततेसाठी प्रयत्न करणारे आघाडीचे नेते होते अशा शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केल्याचे या वृत्तामध्ये आहे. तसेच इंदिरा गांधी यांनाही १९७१ मध्ये ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्यात आला होता. यावेळी इंदिरा गांधीही पंतप्रधान होत्या. भारताने पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये (बांगलादेश) झालेल्या युद्धामध्ये १४ दिवसांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर इंदिरा यांना हा पुरस्कार देण्यात आला. याचसंदर्भात ज्येष्ठ लेखक रशिद कडवाई यांनी त्यांच्या एका लेखामध्ये माहिती अधिकार अर्जांचा दाखला देत तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी “इंदिरा यांना या सन्मान देण्याची पूर्ण जबाबदारी घेतोय,” असं म्हणत हा पुरस्कार प्रदान केला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *