भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हलगर्जीपणा भोवला

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

जळगावमध्ये भाजपला नगरसेवकांची नाराजी भोवली.

पुणे : जळगाव महापालिकेत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. दोन्ही महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असताना सुद्धा महापौर निवणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार विनायक राऊत आणि गुलाबराव पाटील यांची भूमिका महत्वाची होती.
या निवडणुकीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेनेला साथ दिली. शिवसेनेचा हा विजय भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय उलथापालथ पाहायला मिळाला. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव केला.
गेल्या अनेक दिवसापासून जळगाव महापालिकेतील कामाबद्दल भाजपच्या नगरसेवाकांमध्ये प्रचंड नाराजी होती. याबाबत त्यांनी आपल्या वरिष्ठांना वेळोवेळी सांगितले होते. मात्र, त्यांची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्याने घेतली नाही. प्रभागातील कामे होत नसल्याने सत्तेत असणाऱ्या भाजप नगरसेवकांना महापालिकेत आंदोलन करावे लागत होते. डिसेंबर महिन्यात भाजपच्या नगरसेविका दीपमाला काळे यांनी महापालिका आयुक्त यांना आपल्या मागण्यांसाठी घेराव घातला होता. सत्तधारी असून आपले काम होत नाही म्हणून अनेक नगरसेवक नाराज होते. याबाबत त्यांनी वरिष्ठांना सांगितले होते. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. नगरसेवकांच्या मागण्यांकडे लक्ष न देणे भाजपच्या अंगलट आले.
स्थानिक आमदार राजू भोळे यांच्याबाबत भाजप नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यांच्या कार्यपद्धतीवर भाजपच्या नगसेवकांनी अनेकवेळा आवाज उठवला होता. मात्र, त्याला वरिष्ठांकडून कुठलीही दाद मिळाली नाही. जळगाव शहरात पिण्याच्या पाण्यासाठी अमृत योजनचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम नाशिक येथील एका कंपनीला देण्यात आले आहे. महापालिकेतील कामे ही मर्जीतील ठेकेदारांना देण्यात येत असल्याचा आरोप सुद्धा या नगसेवकांनी केला होता. मात्र, याकडे सुद्धा भाजपकडून साफ दुर्लक्ष करण्यात आले.
जळगाव महापलिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र आपल्याच पक्षाकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याची भावना भाजप नगरसेवकांमध्ये होती. भाजपला धक्का देण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करण्याची भाजपच्या नाराज नगरसेवकांची इच्छा होती. मात्र, पूर्ण बहुमत मिळेल की नाही याची खात्री नसल्याने त्यांनी शिवसेनाला साथ देण्याचे ठरविले.
२०१८ मध्ये झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ७५ पैकी ५७ जागा भाजपने जिंकल्या होत्या. शिवसेनेला १५ जागा आणि एमआयएमला ३ जागा मिळाल्या होत्या. गुरुवारी झालेल्या महापौरांच्या निवडणुकीत भाजपला केवळ ३० मतं मिळाली. सांगली महापलिकेत स्पष्ट बहुमत असताना सुद्धा भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *