अनिल देशमुखांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी सरसावली; राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुखांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी सरसावली असून राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी सुद्धा राजकीय सुड उगविण्यासाठी ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.
याबाबत जयंत पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. मा. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते.
या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो. असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहले आहे.
तसेच आमदार रोहित पवार यांनी अनिल देशमुखांची सत्ता गेल्याच्या दुःखातून ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.
रोहित पवार म्हणले, देशभरात ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असताना त्याकडं दुर्लक्ष करत भाजप मात्र #CBI #ED यांसारख्या सरकारी संस्थांना हाताशी धरुन आपला गमावलेला महाराष्ट्राचा ‘राजकीय ऑक्सिजन’ मिळवण्याचा प्रयत्न करतंय. त्यांचे नेते बोलतात आणि काही दिवसांतच तशी कारवाई होते. याचा अर्थ स्पष्ट आहे.
राज्यातील सत्ता गेल्याच्या दुःखातून ते अजूनही सावरले नाहीत. पण त्यांना माझी विनंती आहे, की आज लोकांना ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस मिळत नसल्याने लोक अडचणीत आहेत. त्यामुळं स्वतःच्या राजकीय दुःखाकडं लक्ष न देता अडचणीतील जनतेचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करा, ते तुमचं कर्तव्य आहे. अशी आठवण सुद्धा त्यांनी विरोधकांना करून दिली आहे.