राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून देखील चूक, सुमित्रा महाजन यांना वाहिली श्रद्धांजली.

इंदौर : लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना २ दिवसापूर्वी इंदौरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काल त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्हही आला होता. दरम्यान काल त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी व्हायरल झाली आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे ही अफवा अधिक पसरत गेली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी खोटी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झालीये. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप होता, त्यामुळे त्यांना इंदौरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याशिवाय गुरुवारी त्यांचा कोविड रिपोर्टही निगेटिव्ह आला होता.
दरम्यान या व्हायरल बातमी मुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील फसल्या आणि त्यांनी ट्विटरवरून सुमित्रा महाजन यांना श्रद्धांजली वाहिली.
‘ माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्राताई महाजन यांचे निधन झाले. ही बातमी दुःखद व वेदनादायी आहे. त्या लोकसभा अध्यक्ष असताना व त्यापुर्वी देखील त्यांच्याशी अनेकदा भेट झाली होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्त्व हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली.’ असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिलं होतं.
शशी थरूर यांनीही याबाबत ट्वीट केलं होतं. मात्र काही वेळाने त्यांनी ते ट्वीट डिलिट केलं. आणि चुकीचं ट्वीट केल्याबाबत माफी मागितली.
Thanks @kailashOnline. I have deleted my tweet. I wonder what motivates people to invent and spread such evil news that takes in people. My best wishes for Sumitra ji’s health and long life.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
इंदौर शहरही कोरोनाच्या विळख्यात
सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मध्यप्रदेशातील इंदौर शहरातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या शहरात कोरोनाच्या घातक व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत ९४ हजार ५४९ जणं बाधित झाले आहे.