ओठाला लाली, कानात झुंबर, नऊवारी साडी आणि मानसीची लचकणारी कंबर

मानसी नाईक
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

गणपतीचं दिवस होतं. गावातल्या पोरांनी पंधरा दिवस अगोदर वर्गणी गोळा करून गणपतीचं नियोजन करून ठेवलं. पण यावर्षी गणपतीत कायतर खास असणार याची मला अजिबात भनक लागली नव्हती. जेव्हा गणपतीसमोर भलं मोठं स्टेज उभारलं, शार्पी लाइट लावलं, तेव्हा कळलं काय तर वेगळा विषय आहे.

लायटिंगचा झगमगाट बघून मी काय स्टेजपासून लांब गेलो नाही. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं आज ऑर्केस्ट्रा आहे नऊ वाजता. ठरल्याप्रमाणं लाऊड स्पीकरवर अनाऊंसमेंट झाली. ‘गावकऱ्यांनी चौकातल्या स्टेजसमोर येण्याची विनंती वगैरे.’

एरवी ९ वाजता ऑफ होणारी पोरं चौकात हजर झाली. ऑर्केस्ट्रा सुरु झाला आणि १२ ला संपला. कोल्हापूरचा फेमस ऑर्केस्ट्रा होता म्हणे. टीव्हीत हिरो-हिरोईन डान्स करतात, तसाच प्रकार आहे, असं म्हणून आम्ही करमणूक करून घेतली.

पण तो ऑर्केस्ट्रा आजही लक्षात राहिला कारण त्यात एक पोरगी झकास नाचली होती रिक्षावाल्या गाण्यावर.

कामावर जायला, उशीर व्हायला
बघतोय रिक्षावाला गं वाट माझी बघतोय रिक्षावाला

हे गाणं वाजवल्यानं ऑर्केस्ट्रा वेगळ्या लेव्हलवर पोहोचला.

रातीची धमाल काय सांगू बाई
रातभर बेवडा झोपलाच नाही

सकाळ सकाळी लागलाय डोळा
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला..

या ओळी नाईंटी पिणाऱ्या जनतेला जरा जास्तच भावल्या.

तीन चार तासाच्या ऑर्केस्ट्रामध्ये कुठली कुठली गाणी वाजवली काय आठवत नाही. पण रिक्षावाला हे गाणं मार्केट खाऊन गेलं. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत हेच गाणं गणपतीसमोर वाजायचं.

प्रत्येक पोरांनी आपल्या मोबाईलच्या मेमरीत हे गाणं भरुन घेतलं. चौकातलं इलेक्ट्रिक दुकान असो की टमटम, रिक्षा, वडाप.. सगळीकडे रिक्षा वाला गाणं ऐकायाला मिळायचं.

रिक्षावाला हिरो तू माझा
तूच हाय माझा दिलाचा राजा
तीन चार वेळा मिस कॉल आला
बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला

या ओळींनी तर रिक्षावाल्या कार्यकर्त्यांच्या काळजात घरच केलं.

पुढं काही वर्षांनी आणखी एका गाण्यानं धुमाकूळ घातला. ते गाणं होतं, ‘बाई वाड्यावर या’. हे गाणं मार्केटमध्ये आलं तेव्हा गावखेड्यातल्या लोकांपर्यंत युट्युब पोहोचलं होतं. त्यामुळे लोकांना ‘बाई वाड्यावर या’ गाण्यावर थिरकणारी मानसी नाईक बघायला मिळाली.

नाकात नथनी, कानात झुंबर, ओठाला लाली आणि नऊवारी साडी घालून कंबर लचकून ठुमकणारी मानसी नाईक बघून काळजाचं नुसतं नुसत पाणी व्हायचं. ‘बाई वाड्यावर या’ म्हणताना मानसीनं दिलेली पोज पापणी मिटू देत नव्हती.

वयात आलेली पोरांनी बाई वाड्यावर या ह्या गाण्याला दिलेलं प्रेम कुठल्याही शब्दात व्यक्त करता येणार नाही.

आजही गावाकडं गेलो तर नांगरट करणाऱ्या एखाद्या ट्रॅक्टरवर आनंद शिंदेंची गाणी सुरु असताना ‘बाई वाड्यावर या’ हे गाणं वाजत असतं. तेव्हा थुई थुई नाचणारी मानसी नाईक आणि लचकणारी तिची कंबर आठवतेच. नांगरट करणाऱ्या ट्रॅक्टरवर रिक्षावाला हे गाणं ऐकण्यात तर वेगळीच मजा आहे.

आता मराठी सिनेइंडस्ट्री माहित झाली. मानसीचा करिअर ग्राफ माहित झाला. त्यामुळे ही दोन गाणी एकीकडे आणि तिचं अख्खं करिअर एकीकडे आहे असं वाटतंय. मलाईका अरोरा, नोरा फतेही या नंतर मानसी तूच आमची पहिली चॉईस.

मानसीनं आज घटस्फोट घेतल्याची बातमी ऐकली. म्हणून आठवलं सगळं बाकी काय नाही.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *