|

बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात माझा देखील सहभाग: पंतप्रधान मोदी

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

ढाका: बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी शहीद झालेले भारतीय जवान, मुक्तिसेनेचे जवान, नागरिक यांना आदरांजली वाहत असल्याचे सांगितले आणि बांगलादेशच्या सर्व नागरिकांना भारतीयांकडून या ऐतिहासिक दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी बांगलादेशमध्ये आणि भारतातही प्रयत्न सुरू होते. बांगलादेशमधील जनतेची भावना भारतीयांना समजत होती. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षात सहभागी होणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या पहिल्या आंदोलनांपैकी एक आहे. मी २०-२२ वर्षांचा असताना माझ्या इतर सहकाऱ्यांसह बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारतात सत्याग्रह केला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बांगलादेशच्या स्वातंत्र्य संघर्षाला समाजातील प्रत्येक स्तरातून पाठिंबा मिळाला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वांनाच ठाऊक आहे. बांगलादेशमधील नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारामुळे आम्ही व्यथित झालो होतो. या अत्याचाराची छायाचित्रे पाहून अनेक दिवस झोपही लागली नव्हती असेही त्यांनी सांगितले.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांची सरकार सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. परस्परांमधील आत्मविश्वास आणि सहकार्यामुळे प्रत्येक अडचणी, समस्यांवर तोडगा काढला जाऊ शकतो. सीमा प्रश्नी झालेला करार हा हेच दर्शवत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. बांगलादेशच्या स्वातंत्र्याची ५० वर्षे, भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे एकाच वेळी येत आहे. दोन्ही देशांसाठी २१ शतकात आगामी २५ वर्षे अतिशय महत्त्वाची आहेत. दोन्ही देशांचा वारसा सारखाच असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *