‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ होम क्वारंटाईन!
मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आमिर घरीच विलगीकरणात आहे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आहे. आमिर खानच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा देत ही सर्व माहिती माध्यमांना दिली.
आमिर खान यांची तब्येत सुधारत आहे. परंतु नुकताच त्याने काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती आणि अनेक कलाकार, नेते यांच्या संपर्कात देखील आला होता आणि यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अशा सगळ्या व्यक्तींनी खबरदारी म्हणून आपापली चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. शिवाय चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी आमिरला शुभेच्छा दिल्याबद्दल त्याने सर्वांचे आभार देखील मानले.
गेल्यावर्षी आमिरच्या घरातील सात कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या सात कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षारक्षक, ड्रायव्हर, घरात काम करणारे नोकर यांचा समावेश होता. अनलॉकनंतर आता कुठे बॉलिवूडची गाडी हळुहळू रुळावर येण्यास सुरुवात झाली होती. निर्मात्यांकडून चित्रपटाच्या चित्रिकरणालाही सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतानाच दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, कार्तिक आर्यन, वरुण धवन, नीतू सिंह यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही कोरोनाची लागण झाली होती.
आमिर खानने १४ मार्च रोजी आपला ५६ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर दुसर्याच दिवशी आमिरने सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली होती. अलीकडेच तो ‘कोई जाने ना’ चित्रपटाच्या ‘हर फन मौला’ या गाण्यात दिसला होता या गाण्यात तो अली अवरामसोबत डान्स केलाय.
मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमात लावली होती हजेरी
आमिर खानने दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावरील कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा गौरव सोहळा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणजेच वर्षा निवासस्थानी झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. यावेळी आमिर खान आणि उद्धव ठाकरे शेजारीच बसलेले होते.