जुळ्या बाळांचा जन्म; २४ तासाच्या आत आईचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे: जुळ्या बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाची लागण झालेल्या आईचा चोवीस तासात मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात ही घटना घडली आहे. जुळ्या बाळांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. त्यामुळे त्याचा धोका टळला असल्याचे तेथील डॉक्टरने सांगितले.
पिंपरी गावातील एका गर्भवती महिलेला त्रास होऊ लागल्यामुळे ४ एप्रिलला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करताना महिलेची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यामुळे त्यांची कोरोनाची अँटीजेन चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांनतर दुसऱ्या दिवशी या महिलेची प्रसुती करण्यात आली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती अधिक खालावत गेली आणि ५ एप्रिलला सकाळी त्यांचा मृत्यू झाला. जन्मलेल्या बाळांचे २४ तासाच्या आत छत्र हरपल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याची डॉक्टरांनी सांगितले आहे.
प्रसूती नंतर महिलेची प्रकृती खालावत असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. महिलेला वाचविण्याचे पूर्ण प्रयन्त केले पण यश आले नसल्याचे वायसीएम रुग्णालयातील डॉ. विनायक पाटील यांनी सांगितले. बाळांना ऑक्सिजन देण्यात आले आहे. बाळाची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांची आरटीपीसीआर रिपोर्ट येणे बाकी आहे. पण त्याची प्रकृती स्थिर आहे. पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात सध्या वीस कोरोना बाधित गरोदर महिला उपचार घेतायेत. पैकी पाच महिला आयसीयूमध्ये दाखल असल्याचेही पाटील यांनी सांगितले.