जगातील सर्वात मोठ्या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव
अहमदाबाद: जगातील सर्वात मोठे मैदान अशी ओळख असणाऱ्या गुजरातच्या मोटेरा अर्थात सरदार पटेल मैदानाचे नाव बदलून नरेंद्र मोदी मैदान असे करण्यात आले आहे. या मैदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले.
अहमदाबाद येथे आज पासून भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सामन्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले. यावेळी गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू, बीसीसीआयचे सचिव जय शहा आदी उपस्थित होते.
यावेळी अमित शहा म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना त्यांनी मोठ्या मैदानाचे स्वप्न पाहिले होते. जे आज पूर्ण झाल आहे. हे मैदान सरावासाठी आधुनिक सुविधांनी पूर्ण आहे. मोदी यांच्या सोबत मी गेली अनेक वर्ष काम करत आहे. त्यांनी नेहमीच तरुणांना खेळासाठी प्रोत्साहीत केल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन झाले होते. तब्बल ६३ एकर क्षेत्रफळावर हे मैदान उभे करण्यात आले आहे. यासाठी ७०० कोटी रुपये खर्च आला आहे. मैदानाची क्षमता १ लाख ३२ हजार आहे. आता पर्यंत ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्नच्या मैदानाला सर्वात मोठे मैदान याचा मान होता. त्यात १ लाख १० हजार प्रेक्षक बसू शकतात.
मैदानाच्या परिसरात क्रिकेट आकादमी आणि सरावासाठी खेळपट्या आहेत. ३ हजार चारचाकी आणि १० हजार दुचाकी मावतील एवढी मोठी पार्किंगची व्यवस्था मैदानात उपलब्ध करून देण्यात आली आहे.