पवारांना चुकीची माहिती, देशमुखांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न फसला- देवेंद्र फडणवीस
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांचे दावे फेटाळून लावले आहे. फडणवीस यांनी काही कागदपत्रे सादर करत गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ फेब्रुवारीला खासगी विमानाने मुंबईला आले होते. असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच शरद पवार यांना चुकीचे माहिती दिली होती. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेतल्याचे सांगत, अनिल देशमुख यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न फसला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख हे १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होम क्वारंटाईन होते असा दावा केला होता. फडणवीस यांनी हा दावा फेटाळत ते १५ आणि २४ फेब्रुवारीला मुंबईत येऊन गेल्याचे सांगितले. तसेच अनिल देशमुख हे घरी कोणा कोणाला भेटले याची माहिती आपल्याला मिळू शकते. अनिल देशमुख होम क्वारंटाईन मध्ये नव्हते. त्यांनी त्या काळात अनेक अधिकारी, मंत्री यांची भेट घेतल्याचा दावा फडणवीस यांनी केला.