पुण्यात मिनी लॉकडाऊन; कडक निर्बंधांची होणार अंमलबजावणी

पुणे : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळतोय. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कडक करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आले आहे. ही बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.
पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी असणार आहे. हे निर्णय उद्यापासून ७ दिवसांसाठी राहणार आहे. दिवसभर जमाव बंदी तर रात्री संचारबंदी असणार आहे यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. पुढील ७ दिवस हॉटेल, बार रेस्टॉरंट आणि सिनेमा हॉल बंद राहतील अशी घोषणा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली. तसेच पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणारी PMPL बससेवा बंद राहणार आहे. मात्र या PMPL बंदला महापौर आणि खासदारांनी विरोध केला होता. ३० एप्रिल पर्यंत पुण्यातील शाळा बंद राहणार. या दरम्यान ससून रुग्णालयात ५०० बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे.
- हे आहेत नवीन नियम
- -दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी
- – हॉटेल, बार, बंद राहणार
- -धार्मिक स्थळे, आठवडे बाजार बंद
- – मॉल, सिनेमा हाॅल बंद
- – तर एसटी सुरु राहणार आहे
- या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित होते.
पुणे कोरोना अपडेट्स,
१ एप्रिल २०२१
– उपचार सुरु : ३५,८४९
– नवे रुग्ण : ४,१०३
– डिस्चार्ज : २,०७७
– चाचण्या : २०,६८१
– मृत्यू : ३५