अनेक लोक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक, कोरोनामुळे थांबलेत – जयंत पाटील

नवी मुंबई : नवी मुंबईतील शिवसेनेचे नेते नामदेवराव भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षप्रवेश झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. गणेश नाईक जरी पक्ष सोडून गेले तरी आदरणीय पवार साहेबांवर निष्ठा असणारे अनेक कार्यकर्ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आहेत असे सांगत नामदेवराव भगत यांच्या येण्याने पक्षाला नवी मुंबईत उभारी येईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. अनेक लोक आज राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत मात्र कोरोनामुळे थांबले आहेत. पण येत्या काळात राष्ट्रवादी हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष असेल. राष्ट्रवादीत प्रेम, जिव्हाळा, विचार आहे आणि प्रत्येकाला महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे नामदेवराव भगत योग्य ठिकाणी आले आहेत असे जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांची विचारपूस केली जाते, त्यांचा सन्मान ठेवला जातो म्हणून पक्षात प्रवेश केला. यापुढे पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पूर्ण करेन, असा विश्वास नामदेवराव भगत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी अनिल गोटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल गावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख उपस्थित होते.