मोफत लसीकरण करण्याच्या ममता बॅनर्जींच्या घोषणेला काहीही अर्थ नाही – भाजप

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे की, पश्चिम बंगाल सरकार येत्या ५ मे पासून राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देईल. कोरोना लसींच्या वेगवेगळ्या किमतीवरुन ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं आहे. ममता बॅनर्जी यांनी मोफत लसीकरण करण्याच्या घोषणेनंतर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपने म्हटलं, केंद्र सरकराने यापूर्वीच घोषणा केली आहे की, १ मे पासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू कऱण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल २ मे रोजी जाहीर होतील आणि तेव्हाच कळेल की ममता बॅनर्जी यांचे सरकार राहणार नाही त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी दिलेल्या या घोषणेला काहीही अर्थ नाहीये.
कोरोना प्रतिबंधक लसींच्या किमती वेगवेगळ्या ठेवणं योग्य नाही – ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून म्हटले की, केंद्र सरकारने जाहीर केलेली लसीकरणाचे धोरण हे जनविरोधी आहे. हे धोरण सामान्यांच्या हिताचे नाहीये. लसींच्या वेगवेगळ्या किमती ठेवणं योग्य नाहीये.
पश्चिम बंगाल सरकार ५ मेपासून लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. यासाठी पश्चिम बंगाल सरकारने १०० कोटींचा निधी तयार केला असून केंद्र सरकारकडून १ कोटी लसींची मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, अशा प्रकारे कोरोना प्रतिबंधक लसींच्या किमती वेगवेगळ्या ठेवणं योग्य नाही.
भाजपचे प्रवक्ते शामिक भट्टाचार्य यांनी म्हटलं, ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस कोविडच्या मुद्द्यावरुन गदारोळ घालत आहेत. नागरिकांना घाबरवत आहेत, मतदानाला जाऊ नका कोरोनाचा संसर्ग आहे असं सांगत आहेत. यापूर्वी तृणमूल काँग्रेसने लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन राजकारण केलं आणि आता कोरोना प्रतिबंधक लसीवरुन राजकारण करत आहे.