|

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस अध्यक्ष होणं निश्चित? विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने चर्चा..

मल्लिकार्जून खरगे
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

कधी नव्हे ते काँग्रेस पक्षात अध्यक्षपदासाठी निवडणूक लागली. काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतील असलेल्या अशोक गेहलोत यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र,गेहलोतांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार देत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. दुसरीकडे गांधी घराण्यावर नाराज असलेल्या काँग्रेसमधील G23 गटातील शशी थरूर यांनी देखील काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेत आपला अर्ज दाखल केला. मात्र, गेहलोतांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यावर सोनिया गांधींनी आपले विश्वासू मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांना निवडणुकीसाठी परवानगी दिली होती.

परंतु काल अचानक दिग्विजय सिंगांचे नाव मागे पडून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव समोर आले. काँग्रेसला २४ वर्षांनी बिगर गांधी घराण्याचा अध्यक्ष मिळणार आणि ते नाव मल्लिकार्जुन खरगे यांचं असणार हे आता निश्चित मानलं जातं आहे. ३० सप्टेंबरला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख होती. या तारखेला मल्लिकार्जुन खरगे यांची एंट्री झाली. गुरूवारी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे या लढतीत मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.

अर्ज भरताना खरगेंबरोबर अशोक गेहलोत, दिग्विजय सिंह, ए. के. अ‍ॅण्टनी, अंबिका सोनी, प्रमोद तिवारी, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, पवन बन्सल, पी. एल. पुनिया, पृथ्वीराज चव्हाण, आनंद शर्मा, मनीष तिवारी, भूपिंदर हुडा, तारीक अन्वर, राजीव शुक्ला, दीपेंदर हुडा, कुमारी सलेजा आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. खरगेंच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणारे सगळे नेते पक्षामध्ये विविध पदांवर आहेत. अनुमोदकांपैकी अनेक जण गांधी निष्ठावान मानले जातात. गांधी कुटुंबातील सदस्यांनी एकाही सदस्याला पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी खरगे हे गांधी कुटुंबाचे ‘अधिकृत’ उमेदवार ठरले आहेत. पाठिंबा देणाऱ्या नेत्यांमध्ये बंडखोर ‘जी-२३’ गटातील नेत्यांचाही समावेश होता.

मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय निश्चित कशामुळे मानला जातोय?
सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आजच मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेच्या विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसला राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून इतर कुठल्या तरी नेत्याची निवड करावी लागणार आहे. राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये दिग्विजय सिंह, पी चिदंबरम, जयराम रमेश असे काही नेते आहेत ज्यांच्यापैकी एकाची वर्णी या पदावर लागू शकते.

कट्टर काँग्रेस कार्यकर्ते आहेत मल्लिकार्जुन खरगे
पुढचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कसा असला पाहिजे? हा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला असता ते म्हणाले की अध्यक्ष कुणीही झालं तरी हरकत नाही, पण त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यांचे विचार, विश्वास, धोरण आणि भारताविषयीचा दृष्टीकोन या सगळ्याचं प्रतिनिधीत्व होतं. राहुल गांधी यांनी जे सांगितलं त्या उत्तरात मल्लिकार्जुन खरगे हे एकदम फिट बसतात. कारण मल्लिकार्जुन खरगे हे कट्टर काँग्रेसी आहेत. त्यांनी अगदी कार्यकर्ता पदापासून काँग्रेसमधली कारकीर्द सुरू केली आहे. १९६९ मध्ये ते गुलबर्गा सिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.

G23 नेते ऐन वेळी खरगेंच्या मागे:

काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर शुक्रवारी वाजतगाजत पक्षाच्या मुख्यालयात आले; पण अर्ज भरताना ते एकटे पडल्याचे चित्र दिसले. उमेदवारी अर्ज दाखल करताना बंडखोर ‘जी-२३’ गटातील एकही सदस्य त्यांच्याबरोबर नव्हता. बंडखोर नेते खरगे यांच्या शेजारी उभे होते.

मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध
मल्लिकार्जुन खरगे यांचे विरोधी पक्षांशीही सौहार्दाचे संबंध आहेत. भारत जोडो यात्रा आज कर्नाटकात पोहचली आहे. आता काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी ही यात्रा बेल्लारी येथे असणार आहे. तर १९ ऑक्टोबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक हे काँग्रेससाठी महत्त्वाचं राज्य मानलं जातं आहे.

काय म्हणाले शशी थरूर:

पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ‘अधिकृत उमेदवारा’बाबत होत असलेली चर्चा मला माहीत आहे.पण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचे सोनिया गांधी यांनी मला सांगितले आहे. तुम्हाला सध्याचीच परिस्थिती कायम ठेवायची असेल तर तुम्ही खरगेंना मत द्या, पण तुम्हाला पक्षात बदल आणि प्रगती हवी असेल, तर मी त्या बदलासाठीच उभा आहे. असं थरूर म्हणाले आहेत.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *