महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार होते,पण…
मुंबई: सचिन वाझे प्रकरण, परमबीर सिंह यांचा लेटर बॉम्ब, फोन टॅपिंग आदी प्रकरणामुळे राज्यातील वातावरणात तणाव पाहायला मिळत आहे. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती, महाविकास आघाडीच्या वतीने आज भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यात येणार होती. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने ही भेट टळली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार होते. मात्र, राज्यपाल देहरादून येथे गेल्याचे राजभवनातून कळविण्यात आल्याने ही भेट टळली.
मुकेश अंबानी याच्या घरासमोर स्फोटके, मनसुख हिरेन यांचा मृत्यू, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर केलेले आरोप, पोलीस दलातील बदल्या बाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप यामुळे सरकार अडचणीत आले आहे. भाजप नेत्यांनी राज्यपाल यांनी मुख्यांत्र्याना या सर्व विषयावर बोलत कराव अशी मागणी केली होती. तसेच अनिल देशमुख यांनी राजीनाम द्यावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
भाजपच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल यांची भेट घेणार होते. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली होती. आघाडी सरकारची बाजू राज्यपाल यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले होते. मात्र, राज्यपाल मुंबईत नसल्याने भेट टळली आहे. २८ मार्च पर्यंत ते देहरादून ला असणार आहे अस समजले आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यपालांना सरकारी विमानातून प्रवास नाकारला होता. त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता.