| |

ना खैरे, ना राजे! संजय पवारांची अचानक एन्ट्री, संभाजीराजेंचं गणित कुठं बिघडलं?

संजय पवार
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

राज्यसभेच्या निवडणुका लागल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. एकूण 56 जागांपैकी महाराष्ट्राच्या खात्यात 6 जागा आहेत. त्यातील 5 जागांवर बिनविरोध निवडणूक होणार हे निश्चित असलं तरी 6 व्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं.

शिवसेनेने 6व्या जागेसाठी दंड थोपटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. कारण ठरलं, 6 व्या जागेसाठी उमेदवार कोण?, राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार संभाजीराजे प्रबळ दावेदार होते. मात्र, शिवसेनेने अट टाकून संभाजीराजेंचं गणित बिघडवलं.

शिवसेनेने संजय राऊतांची उमेदवारी निश्चित केली. त्यानंतर आणखी एका जागेसाठी उमेदवार कोण?, असा सवाल उपस्थित केला जात होता. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांची चर्चा होती. मात्र, काही काळानंतर चंद्रकांत खैरेंचं नाव अंधारात गेलं. त्यानंतर शिरूरचे माजी आमदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि उर्मिला मातोंडकरचं नाव समोर येऊ लागली. तर दुसरीकडे संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरू होती.

शिवसेनेचं शिवबंधन बांधल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी देता येणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. मात्र, संभाजीराजेंना शिवसेनेची ही अट मान्य नव्हती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रश्न सुटेल अशी शक्यता असताना अचानक काल रात्रीपासून कोल्हापूरच्या संजय पवारांचं नाव चर्चेत येऊ लागलं. त्यामुळे आता संजय-संजय राज्यसभेवर शिवसेनेचा किल्ला लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

संभाजीराजे प्रतिष्ठीत छत्रपती घराण्यातील असल्याने राजकीय पक्षाच्या नादाला लागण्याची त्यांची इच्छा नाही. मागील टर्मप्रमाणे यंदा देखील त्यांना त्यांची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे शिवसेना संभाजीराजेंना पक्षात सामिल करून घेण्यासाठी उत्सुक आहे. त्याचा फायदा शिवसेनेला कोल्हापूरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, शिवबंधन न बांधता संभाजीराजेंना पाठिंबा देणं शिवसेनेला मान्य नसल्यात जमा आहे. त्याचा तोटा शिवसेनेला होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येतीये. मराठा समाज शिवसेनेवर पुन्हा नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

राज्यसभेच्या उमेदावारीसाठी संजय पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. आज संध्याकाळी या सर्व गोष्टींचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे. संजय पवार कोल्हापूरचे कट्टरशिवसैनिक म्हणून ओळखले जातात. संजय पवारांना उमेदवारी देऊन संभाजीराजेंना शह देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याचं पहायला मिळत आहे.

कोण आहेत संजय पवार?

संजय पवार सध्या कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख. 1989 साली संजय पवारांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरात आपलं स्वतंत्र अस्तित्व तयार केलं. जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसात त्यांनी शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण झाली.

शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी 1990 साली कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवली आणि त्यांना त्यात यश देखील मिळवलं. 1990 साली पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सीमाभागात विशेषत: बेळगावात कानडी विरुद्ध मराठी वाद निर्माण झाला त्यावेळी संजय पवारांनी आक्रमक आंदोलने केली आहेत.

शिवसेनेने संजय पवारांना अनेकदा संधी दिली आहे. 1990, 1996 आणि 2005 मध्ये नगरसेवक म्हणून संजय पवारांना संधी मिळाली. त्यानंतर 2008 साली त्यांची कोल्हापूरच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेने आता त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, छत्रपती घराण्याचा मी आदर करतो. ते आदरणीय कुटूंब आहे. माझ्याकडून राजेंचा अपमान व्हावा, अशी माझी इच्छा नाही. पण आदेश निघाला तर संभाजीराजेंविरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे. शेवटचा निर्णय हा उद्धव साहेबांचा असेल, असं संजय पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा की-

काकांच्या अंत्यविधीवेळी पुढाकार घेत ‘विधवा प्रथेला’ दिली मुठमाती; रुपाली चाकणकरांचा क्रांतीकारी निर्णय!


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *