जेष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई: जेष्ठ गायिका आशा भोसले यांना मनाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण जाहीर झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण देण्याचे निश्चित करण्यात आले.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीची बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील येद्रावकर आदी उपस्थित होते.
याचनिमित्ताने आशा भोसले यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी
- ८ सप्टेंबर १९३३ रोजी जन्मलेल्या ‘मेलोडी क्वीन’ अर्थात आशा भोसले यांनी १९४३ मध्ये कारकीर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांचं गायन सुरुच आहे.
- १९४८ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘चुनरिया’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये गायला सुरुवात केली. संगीतकार हंसराज बहल यांनी ‘सावन आया’ गाण्यासाठी आशाबाईंना संधी दिली होती.
- आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह २० भाषांमधून गाणी गायली आहेत. तर आपण १२ हजारांपेक्षा जास्त गाणी गायल्याचं आशाबाईंनी २००६ मध्ये सांगितलं होतं.
- गिनीज बुक ऑफ रेकॉर्डनुसार आशा भोसले यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत.
- भारत सरकाराने या महान गायिकेचा दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान केला आहे.
- आशा भोसले यांनी फक्त गायनातच नाही तर अभिनयातही झलक दाखवली. त्यांनी ‘माई’ चित्रपटात अभिनय केला होता आणि त्यांची कौतुकही झालं होतं.
- आशा भोसलेंच्या करिअरच्या सुरुवातीला गीता बाली, शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांसारख्या मोठ्या गायिका आपल्या आवाजाने चित्रपटसृष्टी गाजवत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशाताईंच्या वाट्यात येत असत.
- आशा भोसले यांना १८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं, त्यापैकी सात वेळा त्यांनी पुरस्कारावर नाव कोरलं. १९७९ मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाताईंनी स्वत:चं नामांकन नाकारलं, कारण नव्या गायकांना संधी मिळावी. आशा यांना २००१ मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं.
आशा भोसले या पहिल्याच अशा गायिका आहेत, ज्यांना उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अलबमसाठी ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.