लॉकडाऊन की कडक निर्बंध?
कोरोना संदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे.कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यात गेले काही दिवस रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठल्यानं चिंता वाढली आहे. मुंबई, पुणे, नागपुर या तीन शहरात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोनाचा सामना करण्यासाठी पुढची रणनीती आखली जाऊ शकते.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालच म्हटलं होतं की कोरोनाचे रुग्ण वाढत असतील तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन करावा लागेल. ‘मुख्यमंत्र्यांशी मी काल फोनवर चर्चा केली तेव्हा त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्ती केली होती. राज्यात रोज २५ ३० या संख्येनं रुग्ण आढळत असतील तर हे योग्य नाही आपल्याला फार कडक उपाययोजना कराव्या लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच, रुग्णसंख्या जास्त वाढत असतील तर काही शहरांत लॉकडाऊन करावं लागेल किंवा रुग्णवाढीचा दर असाच अधिक कालावधी राहिला तर राज्यातही अधिक कठोर निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्र्यांचं मत आहे,’ असं म्हणत कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला लॉकडाऊनचा इशारा दिला होता. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन/अंमलबजावणी राज्यात होत असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले. सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र, वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले.
या आज मुद्द्यावर आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. राज्यात कडक निर्बंध लावायचे की लॉकडाउनचा निर्णय याबाबत चर्चा होऊ शकते.