आता मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यात सुद्धा लॉकडाऊन
बीड: राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वाशीम जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. काल पासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. आता बीड जिल्ह्यात सुद्धा १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. २६ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. बीडचे जिल्हाधिकारी जगताप यांनी लॉकडाऊनचा आदेश काढला आहे. २६ मार्च रात्री पासून ४ एप्रिल पर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. याआधी बीड जिल्ह्यात रात्री ७ ते सायंकाळी ७ वाजे पर्यंत संचारबंदी लावण्यात आली होती.
मात्र हातावर पोट असणाऱ्या वर्गाकडून लॉकडाऊन लावण्यात येवू नये अशी मागणी करण्यात येत आहे. मराठवाड्यात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या वर्षभरात मोठे नुकसान झाले आहे यामुळे लॉकडाऊन करू नये अशी मागणी मजुरांनी केली आहे.
बीड शहरातील व्यापारी आणि दुकानात काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. व्यापारी दुकानदार आणि त्यात काम करणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
मंगळवारी राज्यात २८ हजार ६९९ जणांना कोरोनाची बाधित आढळून आले आहे. वाढत जाणारी बाधितांची संख्या पाहता मुंबई, पुणे आदी शहरात लॉकडाऊन लावण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सिले आहेत.