चालाल तरच वाचाल! जाणून घ्या तुम्ही दररोज किती किलोमीटर चालताय?
चालण्याच्या सवयीबद्दल अनेक लोकांची वेगवेगळी मते आहेत. यावर जगभरात अनेक संशोधनं झालेली आहेत त्या सर्व संशोधनावरून एकच निष्कर्ष निघतो कि जितके चालला तितके आरोग्यासाठी चांगले. सर्व प्रकारच्या व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सहज सोपा असतो. त्यासाठी वेगळे असे काही करावे लागत नाही. रोज तुम्ही चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता सुरळीत सुरू राहते. सुमारे ४० वर्षे गांधीजी दररोज सुमारे १८ किमी चालत होते. परदेशात गेल्यावर त्यांना काही कारणास्तव चालण्याची सवय लागली आणि शेवट्पर्यंत हीच सवय त्यांच्या दिवसाच्या वेळापत्रकात असायची. त्यांनी त्यांच्या आयुष्यात चालण्याला प्रचंड महत्त्व दिलं.
नियमित जितका वेळ तुम्ही चालता तितक्या जलद गतीने कॅलरीज घटण्यास मदत मिळते. शरीर फिट ठेवण्यासाठीचा हा सोपा व्यायाम प्रकार आहे. याव्यतिरिक्त तुमच्या रक्तातील शुगर देखील नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत. त्यामुळे काही पाऊले चाललो, तरी अनेकदा धाप लागते. लक्षात ठेवा असे होत असल्यास, हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे. त्यामुळे चालायची संधी मिळाली तर सोडू नका.
साधारणपणे रोज तीस मिनिटे चालल्यास २०० कॅलरीज बर्न होतात. एकट्याने चालणे कंटाळवाणे वाटत असल्यास मित्र-मैत्रिणीसोबत चालण्यास सुरवात करावी. सुरवातीला कमी वेळ आणि अंतर चालून, हळूहळू तुम्हाला शक्य असेल तेव्हा सकाळ-संध्याकाळला ३० मिनिटे चालायला सुरुवात करा कालांतराने तुमची कमी वेळात जास्त चालण्याची क्षमता वाढत जाईल. १६ ते १७ वयोगटातील मुलामुलींसाठी कमीत कमी १२ हजार ते १५ हजार पावले चालणे आवश्यक आहे. १८ ते ४० वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांनी दररोज १२ हजार पावले चालणे आवश्यक आहे. आणि ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींनी कमीतकमी दिवसातून ११ हजार पावले चालणे आवश्यक आहे.
नुसतं चालण्यानंसुद्धा तुम्हाला अनेक फायदे होतील, जसे कि-
- हृदय निरोगी राहते, त्याचे कार्य व्यवस्थित सुरू राहते.
- रक्ताभिसरण सुधारते.
- रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- फुप्फुसाची क्षमता वाढते.
- शरीराला जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.
- चालण्याने मेंदू व मज्जासंस्था तणावरहित होतात.
- स्मृतिभ्रंश व वृद्धत्व अशा आजाराचा धोका राहत नाही.
- वाढत्या वयात आपले स्नायू कमकुवत होतात. चालण्याने स्नायूमध्ये अधिक ताकद येते.
- हाडांमधील ठिसूळपणा कमी होतो.
- शरीरातील हिट सुद्धा कमी होते.
- चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असेही संशोधनातून समोर आले आहे. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचाही शरीराला पुरवठा होतो. जेवल्यानंतर शतपावली करावी जेणेकरून रोजच्या चालण्याने पचनशक्तीदेखील सुधारते. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते जेणेकरून आजारांशी सामना करणे सोपे जाते.
जागेची उलब्धतता नसेल किंवा वेळ कमी असेल तर घरच्या घरी, गॅलरी किंवा सोसायटीखाली रात्री जेवल्यानंतर शतपावली करावी किंवा किमान सकाळी तरी अर्धा तास चालावे. आजकाल मोबाईल मध्येही पावले मोजण्याचे तंत्रज्ञान आले आहे. त्या संबंधित अॅपच्या साहाय्याने रोज किती चालतो हे मोबाइलवर कळते. किंवा पेडोमीटरवर /स्मार्टबँड इत्यादीचा वापर करावा. जेणेकरून आपल्याला स्वतःच्या चालण्याचे रेकॉर्ड मेंटेन ठेवायला सोपे जाईल.
सर्वात महत्वाचे गुडघेदुखी, सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूपच जोरात अथवा खूपच हळू चालू नये. चालताना शक्य असल्यास बुटांचा वापर करा, अनवाणी तर चालूच नका जखम व्हायची शक्यता असते. तसेच गवतावर किंवा मातीवर चालल्यास ते जास्त फायदेशीर ठरेल. चालण्यासाठी जाण्याआधी बाहेरच्या वातावरणानुसार कपडे जरूर घाला. तसेच हे कपडे तुमच्या शरीरासाठीही आरामदायक हवेत तर झालेल्या व्यायामाचा तुम्हाला फायदा होईल. चालण्याच्या व्यायाम प्रकारामुळे शरीराची आणि मनाची मरगळ निघून जाते. मनातील ताणतणाव, नैराश्य कमी होते आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळे मानसिक आरोग्य ही मजबूत ठेवता येते. आणि अजून महत्वाचे म्हणजे, चालताना जर तुम्हाला त्रास म्हणजेच श्वास रोखला जाणे, छातीमध्ये दुखणे तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.