“तुझ्यावर बलात्कार होऊ दे मग मी त्यावर चित्रपट बनवेल”

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

‘फुलनदेवी’ आज या जगात नसली तरी इथल्या चित्रपटामधून, कथांमधून, गाण्यांमधून जिवंत आहे. संपूर्ण जगासाठी ती दरोडेखोर, डाकू होती. मात्र, इथल्या लोकांसाठी मदतीला धावून येणारी ‘देवमाणूस’ म्हणून तिची ओळख होती. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला फूलन देवींना चंबळच्या खोऱ्यातील सगळ्यात खतरनाक डाकू मानलं जात असे. तिला बँडीट क्वीन म्हणून ओळखलं जायचं. १९७६ ते १९८३ साला पर्यंत चंबळच्या खोऱ्यात फुलनदेवीचे राज्य होते. बेहमई घटनेनंतर १२ फेब्रुवारी १९८३ रोजी तिने मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जूनसिंह यांच्यासमोर काही अटींसह शरणागती पत्करली आणि १९९४ मध्ये तुरुंगवास पूर्ण करून बाहेर आली तिने थेट राजकारणात प्रवेश केला.

१९९४ साली फुलन देवीची सुटका झाल्यानंतर मारी तेरेज क्यूनी आणि पॉल रोंबाली यांनी फुलनच्या जीवनावर आधारित तिच्याच शब्दात कहाणी लिहिली आणि पुस्तकरूपानं प्रकाशित केली. हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी दोन वर्षं लागली. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा डॉ. प्रमोद जोगळेकर यांनी मराठी अनुवाद केला आहे. हे पुस्तक जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित केलं गेलं आहे. तसेच तिच्या आयुष्यावर शेखर कपूर यांनी बनवलेला ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपटामुळे ती जगभरात प्रसिद्ध झाली.  चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं प्रत्येक दृश्य बघून अंगावर काटा येतो. मात्र या चित्रपटामध्ये अनेक प्रसंग दाखवलेले नाहीत. जें दाखविणे गरजेचे होते व काही दाखवले गेलेले प्रसंग खरेसुद्धा नाहीत. त्यामुळे चित्रपटावर फुलन ने आक्षेप घेतला होता. कारण तो सिनेमा फुलनची परवानगी घेऊन बनवलेला नव्हता त्यामुळे तिने कोर्टात धाव घेतली.

फुलनचा मुख्य आक्षेप होता तो बलात्काराचा घटनांवर. कुठल्याही स्त्रीला आपल्यावर झालेल्या बलात्काराची उघड उघड चर्चा व्हावी असं वाटत नसतं. विशेषतः भारतीय समाज जीवनात बलात्कारीतेकडे, नग्नत्वाकडे अजूनही तिरस्काराने पाहिलं जातं. चित्रपट प्रत्यक्ष पाहिल्यानंतर फूलन देवी चांगलीच संतापली होती. शिकार आणि भक्ष या स्वरुपात काही काळ दाखवली गेलेली फुलनदेवी तिला मान्य नव्हती. ती म्हणाली, “मी दरोडेखोर होते. कुणीही कसंही खेळावं अशी बाहुली नव्हते. मी डाकूंची राणी होते, बॉस होते. तेव्हा माझी परवानगी घेतल्याशिवाय झाडाचं पान देखील ह हलायचं नाही!”. १९८१ मध्ये बेहमी या गावात जिथे ठाकूर यांची संख्या जास्त होती तिथे फुलन आणि तिची टोळी शिरते. झालेल्या भीषण हत्याकांडात २२ ठाकूर रहिवासी मारले जातात. या कत्तलीचा वेळी मी तिथं नव्हते असं फुलन म्हणते.

अरुंधती रॉय यांनी इंग्लंडमध्ये हा चित्रपट पाहिल्यानंतर संडे या जर्नलमध्ये एक लेख लिहिला होता. परदेशात हा चित्रपट कौतुकाचा ठरत असला तरीही भारतीय महिलांनी मात्र मनानं फूलनदेवी ची बाजू घेतली होती. रॉय यांनी त्यांच्या लेखात लिहिले होते की, “चित्रपटात पुरुषांचंच राज्य आहे. जेव्हा हे पुरुष फुलनवर अत्याचार करत नसतात तेव्हा याच पुरुषांचं प्रतिनिधित्व करणारा कोणीतरी तिला जवळ घेत असतो. सहानुभूती दाखवत असतो, मदत करत असतो. हे सगळं आश्चर्यकारक आहे. हिंसेला हिंसेने उत्तर देणाऱ्या एका धाडसी महिलेला या चित्रपटात एक ‘भक्ष्य’ म्हणून दाखवलं गेलं. या चित्रपटामुळे डाकूंची राणी फूलन देवी हीचं एका प्रसिद्ध ‘बलात्कारित बळी’ म्हणून रूपांतर झालं. फुलन ही एक अभिमानी महिला आहे. तिच्यावर बलात्कार होत असतानाही तुम्ही तिला पाहणं तिला आवडणार नाही. अपमानित होत असणाऱ्या चित्रपटातील या फुलनला तुम्ही पाहू नये अशी तिची इच्छा आहे”, असे रॉय प्रेक्षकांना बजावतात.

जेव्हा या संदर्भात कोर्टात खटला चालू होता, तेव्हा एक पत्रकार “हा चित्रपट प्रदर्शित होणे खूप महत्त्वाचं आहे कारण तो एक ‘चित्रपट’ म्हणून चांगला आहे” असं फुलनला म्हणतो. जेव्हा ती म्हणते की, ” तुझ्यावर ती वेळ आली नाही म्हणून! तुझ्यावर बलात्कार होऊ दे मग मी ही त्यावर  चित्रपट बनवेन, तेव्हा तुला कसं वाटेल ते बघू”. तिच्या आक्षेपामुळे कितीतरी महिने बँडिट क्वीन हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित झालाच नव्हता. १९९४ मध्ये चित्रपट कुठेही प्रदर्शित केला जाऊ नये म्हणून फूलन देवी ने दिल्लीतील उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याअगोदरच सेन्सॉर बोर्डाने काही आक्षेप घेऊन चित्रपट प्रदर्शनाला परवानगी नाकारली होती. या चित्रपटात दाखवलेल्या काही दृश्यांमुळे खाजगी जीवन लपवून ठेवण्याचा स्वातंत्र्यावर व वैयक्तिक हक्कांवर घाला घातला गेला आहे असं तिचं म्हणणं होतं. न्यायालयाने ती गोष्ट मान्य केली आणि चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली.

परंतु या निर्णयापूर्वी या चित्रपटाचा निर्माता संदीप सिंह बेदी यांनी जगभराच्या २२ देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत करार केले होते. हे करार दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या कक्षात येत नव्हते. त्यामुळे हा चित्रपट भारत सोडून इतर सर्वत्र दाखवला गेला. चित्रपटाला अमाप प्रसिद्धी मिळाली. आणि फूलन देवी परत एकदा प्रकाशझोतात आली होती. परंतु काही कालावधीनंतर चित्रपटातील काही आक्षेपाहार्य प्रसंग कापून चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी तिने दिली. त्या वेळेस तिला निर्मात्याने २० लाख रुपयांची भरघोस रक्कम देऊ केली आणि तिने चित्रपटा विरोधात केलेले सर्व आरोप मागे घेतले होते.

तसं पाहायला गेलं तर फुलनला फार पूर्वीपासूनच प्रसिद्धीची सवय होती. १९८३ मध्ये सरकारला आपल्या अटी मान्य करायला लावल्यानंतर तिने आपण होऊन जेव्हा शरणागती पत्करली तेव्हाही तिला प्रसिद्धी मिळाली होती. १९८३ च्या अगोदरची काही वर्षं फुलंनने एक महिला डाकू या रूपानं प्रचंड प्रमाणात गोंधळ माजवला होता. लूटमार करणं संपत्ती पळवणं दहशतीचं वातावरण निर्माण करणं अनेक जणांना यमसदनाला पाठवणं हा डाकूंच्या धर्म! या धर्माचे तिने कठोर पालन केलं होतं. जंग जंग पछाडलं तरीही अनेकदा पोलिसांना तिचा पत्ता लागला नव्हता. तेव्हा ती डाकू म्हणून कुप्रसिद्ध होती आणि तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक आणि चित्रपट जेंव्हा लोकांसमोर आला तेव्हा ती सुप्रसिद्ध झाली. स्वतःवर झालेल्या अत्याचारांचा बदला घेणारी स्त्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. उच्चवर्णीय सवर्णांच्या दहशतीला दहशतीचंच उत्तर देणारी महिला म्हणून तिचं कौतुक केलं जातं. दीनदुबळे, शोषित मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्व करणारी दुर्गा किंवा काली या नावाने ती ओळखली जायची.

जातिव्यवस्थेच्या विषारी विळख्यात मगरमिठीत अडकून पडलेल्या भारतीय राजकारणात प्रवेश केला होता. आणि त्याच दरम्यान तिने वाजत-गाजत बौद्ध धर्म स्वीकारला होता. ती राजकारणात, ‘यापुढे दीनदलितांच्या  हक्क आणि अधिकारांसाठी लढणार’ असा उद्देश घेऊन ती राजकारणात येते. आणि ती १९९६ साली समाजवादी पक्षाकडून मिर्झापूरची खासदार होऊन संसदेत जाते. १९९९ साली ती पुन्हा खासदार म्हणून निवडून येते. २५ जुलै २००१ रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानाबाहेर तिची गोळी मारून हत्या केली जाते.

अनेक बिकट परिस्थितीमधून स्वतःचा बचाव करणारी ‘टफ’ फुलनदेवी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांना मुलाखत देताना म्हणाली होती की, “मला कधीच डाकू व्हायचं नव्हतं, माझी तशी इच्छाही नव्हती, मी फक्त खूप चिडले होते संतापाने बेभान झाले होते. मी नजरेला-नजर भिडवली आणि या क्षुल्लक कारणास्तव श्रीमंतांनी मला मारलं होतं. हा होणारा अन्याय पाहून माझे वडील रडायचे दुसरे काहीही करता येणं त्यांना अशक्य होतं. म्हणून मी निश्चय केला कि सूड घ्यायचा आणि मी तो घेतला. झालं ते झालं! काहीही झालं नसलं तरी, मी स्वतःला ‘कायद्याचं उल्लंघन करणारी’ समजत नाही. आणि फुलन खरोखरच लढली होती. गरिबातील मानहानीचा तिने तिच्या पद्धतीने बदला घेतला होता. बऱ्याचदा गरिबांना बदला घेण्याकरीता कायदा मोडावा लागतो निदान तसे आढळून तरी येते. फुलनने तसंच केलं. तिच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावरून तरी असंच वाटतं की, कुठल्याही परिस्थितीत दबून बसणाऱ्यांपैकी ती नव्हती. काहीही असलं तरी डाकूंची राणी होण्याइतपत सामर्थ्य तिच्याकडे नक्कीच होतं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *