जाणून घ्या पाडाव्यापासून सूरु होणाऱ्या कृषी धर्मातील लोकविधि…

learn-the-folklore-of-agriculture-starting-from-padava
अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढीपाडव्यास लोक-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय तिच्यात सूर्य बीज पेरतो. वर्षनाच्यामुळे भूमी सुफलित होते. सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात.

कृषी जीवनात सगळीकडेच पावलोपावली वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या विधी/सण आढळतात. पाडव्याला नववर्ष सुरू होतं. तेव्हापासून कृषी क्षेत्रातील प्रत्येक कामाच्या वेळी विधी केला जाताना दिसतो. मशागत करून पावसाची वाट पाहणं, पेरणी करणं, लावणी करणं, इंधन खुरपं, कापणी, मळणी एवढेच काय तर पीक घरी आणण्यापर्यंत कृषी व्यवहारात विविध विधी केले जातात. असे विधी कृषी बद्दलच्या कृतज्ञतून आणि प्रतिकूलाच्या भयातून जसे आले तसे ते लोकविज्ञानातूनही आलेले दिसतात. कृषी विधींची प्रयोजन कोणतीही असोत पण त्याच अपरिहार्यत्व हा कृषीधर्मच बनला आहे.

साधारणतः महाराष्ट्राच्या सर्वदूर भागातील कृषी संस्कृतीत विधी पहावयास मिळतातच. वेगवेगळ्या भागात विधींचं स्वरूप हे प्रदेशपरत्वे बदलते. हा बदल भुप्रदेश पिक, माणसांच्या गरजा, उपलब्ध साधन सामग्री, पारंपारिक धारणा, रूढ लोकविश्वास, यांच्या स्वरूपानुसार होत असतो. असं असलं तरी कुठलीही कृषी संस्कृती ही विधीशिवाय समृद्ध झालेली दिसत नाही. आपल्याला सर्वांनाच माहिती असलेला एक सण म्हणजेच पोळा. कृषी समाजातला पोळा महत्त्वाचा विधी मानला जातो. पोळ्याप्रमाणेच इतरही काही कृषी विधींचं स्वरूप आणि प्रकार आज आपण बघूया…

नागरपूजा:

शेतकऱ्यांचं नववर्ष हे पाडव्याला सुरू होतं. पाडव्यापासून शेतीच्या उदीमास सुरुवात होते. नांगरणी, वखरणी अशी पूर्व मशागतीची कामे सुरू होतात. पहिल्यांदा नांगर शेतात नेल्यानंतर नांगरणी करताना नागराचा फाळ ज्या ठिकाणी टेकवून नांगरणीची सुरुवात केली जाते, त्या ठिकाणी हळदी-कुंकू वाहून नारळ फोडला जातो. आदिवासींचा हा महाराष्ट्राच्या अनेक भागात ही पूजा विधि म्हणून केला जातो.

पाऊस मागणं :

कृषी संस्कृतीचा कणा म्हणजे पाऊस. हवा तेव्हा हवा तेवढा पाऊस झाला तरच शेतकऱ्यांच्या आयुष्यात  चैतन्य टिकून राहते, नाही तर कितीही घामाचा पाऊस पडला तरीही त्याचं चीज होत नाही. सर्व धर्म व्यर्थ जातात. कृषी जीवनाला विस्कळीतपणा येऊ लागतो. कामकाज बंद होतात. भविष्याचा प्रश्नचिन्ह अनुत्तरीत फोन समोर उभा टाकतं. शेतकऱ्यांचं  लोकजीवन हवालदिल होतो. आणि मग पाऊस पडण्यासाठी परंपरेने चालत आलेले विधी केले जातात. हे विधी शेतकऱ्यांच्या लोकधर्माचा एक भाग असतात.

धोंडी :

गावातली पोरं मिळून लिंबाच्या डहाळ्या तोडून आणतात. एक बेंडकोळी धरून तिला मुसळाला उलटी टांगतात. यां मुसळाला लिंबाच्या डहाळ्या बांधतात. पोरं पण त्या डहाळ्या कमरेला बांधतात. दोघ खांद्यावर बेंडकोळी बांधलेले मुसळ घेतात. एकाच्या हातात झोळी असते. बाकी सगळे उड्या मारत सोबत निघतात. गावात प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन गाणं म्हणतात. त्या-त्या घरची मालकीण घडाभर पाणी त्या पोरांच्या अंगावर टाकते. बेंडकोळीला व मुसळाला हळद कुंकू वाहून पूजा करते अन पोरांच्या झोळीत भाकरी टाकते. पुन्हा पोरं पुढच्या घरी जातात. असं गावभर फिरून झालं की, ही पोरं मारोतीच्या पारावर जमतात. मुसळाची बेंडकोळी सोडून देतात. अंग पुसून कपडे घालतात, जाळ करून शेतात बसतात आणि जमा झालेल्या भाकरी खातात.

घड:

रात्रीचं जेवण-खाऊन झालं की गावातल्या बायका एखाद्या ओसरीवर जमा होतात. मोठा हंडा आणला जातो. भांड्यात पाणी भरून त्यात एक बेंडकोळी सोडतात. त्यात लिंबाच्या डहाळ्या टाकतात, या हंड्यावर काठवट ठेवतात. हंड्याची हळदीकुंकू लावून पूजा करतात आणि गाणी म्हणतात. अखेर घडाची आणि बेंडकीची पूजा करून बेंडकी सोडून देतात.

येळा आमोशा :

मार्गशीष महिन्यातील अमावस्या शेतकरी समाजात ‘येळा अमोशा’ म्हणून साजरी केली जाते. या दिवशी घरातील बायका मुलं सकाळी स्वयंपाकाच्या तयारीनिशी शेतात जातात. रब्बीचा हंगाम ऐन भरात आलेला असतो.  शेतातील एखाद्या झाडाच्या खाली किंवा पडीक जागेवर जागा साफसूफ करून कडब्याच्या पाच पेंड्याची कोपी तयार करतात. त्या कोपीला शाल किंवा बायकाच्या वलीने झाकून घेतात. एक टोक कोपीला घट्ट बांधून ठेवतात. रब्बी ज्वारीचे एक ताट कोपीवर बांधतात. कोपीच्या आतील जागा साफ करून तिथे काळा मातीच्या चिखलाचा पाट तयार करून ठेवतात. त्या पाटावर काळ्या मातीच्या चिखलाचा पाच लक्ष्मी करून ठेवतात. त्या लक्ष्मीचे हळद-कुंकू, रानातील फुलं यांनी विधिवत पूजा केली जाते. याप्रसंगी पाहुण्यांचं गावातील अलुतेदार-बलुतेदार यांना जेवणाचे निमंत्रण दिलेलं असतं. दुपार टळून गेल्यावर कोपीतील लक्षम्यांना आंबील आणि भज्यासह इतर सर्व खाद्य पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि सर्व स्त्रिया मिळून गाणी म्हणतात.

खळंपूजन :

‘खळं’ हा कृषी संस्कृतीतला महत्त्वाचा भाग आहे. शेतात ज्या जागेवर वासणीचा वेल असेल अशी सपाट जागा खळ्यासाठी निवडली जाते. जेवढ्या आकाराचा खळ करायचं तेवढी गोलाकार जागा साफ करून घेतली जाते. त्याला लागूनच ओल्या कडब्याच्या पेढ्यांचं अंथरून करून त्यावर खुडलेल्या कणसांचा फड टाकला जातो. खळ्यासाठी साफ केलेल्या जागेवर मेढ रोवण्यासाठी दर खोदला जातो. मॅडम रोवल्या वर खड्याच्या जागेवर पाणी टाकून चांगला चिखल केला जातो.  तुडवून तुडवून पाणी टाकलं जातं. याला खळ शिंपण असं म्हणतात. साधारणतः संध्याकाळीच खळ शिंपला जातं. रात्रभर हा चिखल सुकतो मग सकाळी त्यावर खुरवत धरला जातो. खुरवत म्हणजे बैलाची मळण. पण ही मळण केवळ चिखल तुडवून जमीन टणक बनावी यासाठी केलेली असते. या खड्ड्याच्या सर्व बाजूने गोलाकार अशा कडब्याच्या पेंढ्या बांधल्या जातात. खेड्यातील कणसं,धान्य खळ्याबाहेर जाऊ नये म्हणून अशी फरसड बांधण्यात येते. या परसडीला लागून खळ्याच्या लक्ष्मीची पूजा मांडली जाते. पूजा करून त्याची आरती केली जाते आणि मगच मळणी सुरू होते.

सीतादही:

ज्वारी-बाजरीच्या खळ्याएवढच कापूस वेचणीचं महत्त्व देखील कृषी संस्कृतीमध्ये पहावयास मिळते. पहिल्यांदा जेव्हा कापूस फुटतो म्हणजेच वेचणीला येतो. तेव्हा शेताची मालकिन कापूस वेचणीला आलेल्या बायकांसह शेतात जाते. जास्त कापूस फुटलेल्या होळीच्या दाट कापसाच्या बुडाला जागा साफ करून ती मातीच्या ढेकळाच्या पाच लक्ष्मी मांडते. कापसाची वस्त्र, हळद आणि कुंकूवाने रंगवली जातात. त्या लक्ष्मीची ओटी भरली जाते. त्या लक्ष्म्यांसमोर रानसिन्या गौऱ्यांचा विस्तव करून  त्यावर एक छोटे बुड ठेवून त्यात दूध आणि वळवट शिजवला जाताना, त्यातलं दुध उतू घातलं जातं. नंतर त्याचाच नैवेद्य त्या लक्ष्मी समोर ठेवला जातो आणि प्रसाद सगळ्यांना वाटला जातो आणि ताक सगळ्या रानात शिंपलं जातं. हा विधी संपला की मग कापूस वेचणीला सुरुवात होते.

अशाप्रकारे महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील कृषी संस्कृतीत वेगवेगळ्या लोक विधी आढळतात. ह्या लोकविधी पारंपारिक लोक विज्ञानाच्या वाहक आहेत. मात्र या कृषीविधींचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला गेला नाही. म्हणून अनेक संपन्न व समृद्ध विधींनाही अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *