Wednesday, September 28, 2022
Homeब-बातम्यांचाकारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविडशी लढत आहोत. येणाऱ्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरु राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरु राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कामगार संघटनांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीस कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खासदार अरविंद सावंत यांच्यासह राज्यातील कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दक्ष आणि सतर्क राहण्याची गरज
मधल्या काळात या संसर्गाची लाट थोपविण्यात महाराष्ट्राला यश आले होते. अडीच ते तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ या दरम्यान साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबेच्या कुटुंबे संसर्गग्रस्त झाली. राज्य सामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. राज्यात फेब्रुवारी 2021 च्या अखेरपर्यंत कोविड संसर्गाचा धोका टळला असल्याचे चित्र होते. मात्र मार्च महिन्याच्या सुरवातीस ग्रामीण भागात विशेषत: कोविडचा अधिक संसर्ग होत असल्याचे दिसून आले. आता आलेली कोविड संसर्गाची दुसरी लाट परतवून लावत असताना तिसरी आणि चौथी अशी कोणती लाट येऊ नये यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.
कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करा
महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी वर्गाबरोबरच कामगारांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे ते आधारस्तंभ आहेत. या कामगार वर्गाची काळजी घेण्यासाठी राज्य शासन एकत्रितपणे प्रयत्न करीत आहे. कोविडशी लढा सुरु असताना राज्याची अर्थव्यवस्था सुरु राहणे आवश्यक असून येणाऱ्या काळात आपण सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणूक आत्मसात करणे आवश्यक आहे. कामगार संघटनांनी यासाठी पुढाकार घेऊन कामगारांना काही महत्वपूर्ण नियमाचे पालन करणे किती आवश्यक आहे हे पटवून देणे आवश्यक आहे.
लसीकरणावर भर देण्यात येणार
आताच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गाला संसर्ग अधिक होताना दिसत आहे. त्यामुळे १ मे पासून राज्यात १८ वरील सर्व नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार आहे. कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कारखानदारांमार्फत कामगारांचे लसीकरण होईल यासाठी पाठपुरावा करावा. कारखानदारांनी कामगारांची आरटीपीसीआर तपासणी कंपनीत करण्याबरोबरच त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करावेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments