के एल राहुलने दिलं सडेतोड उत्तर
पुणे: भारत विरुद्ध इंग्लंडच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी फलंदाजीच नव्हे तर उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केले आहे. भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यात यष्टीरक्षणावरून तुलना केली जाऊ लागली होती. या चर्चांना पूर्णविराम देत केएल राहुलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर राहुलने म्हटले की, “भारतीय संघाचे हे वैशिष्ट्य आहे की, तुम्हाला आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागते. इतकेच नव्हे तर दररोज आपल्याला खेळाडू म्हणून आणखी सुधारणे करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही भारतीय संघाचा भाग असता, तेव्हा तुम्हाला माहीत असते की, इथे खूप स्पर्धा असते. तुम्ही इथे निवांत बसून आपल्या जागेबद्दलचा आत्मविश्वास बाळगू शकत नाही.”
तसेच तो पुढे म्हणाला, “पहिल्या वनडे सामन्यात मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पाचव्या क्रमांकावर मला क्रिजवर आणखी थोडा वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. मी काही चांगले शॉट खेळले होते. तसेच मला फूटवर्कमध्येही फरक जाणवला होता. आता मला अधिक आत्मविश्वास वाढू लागला आहे.”
भारतीय संघाने या संधीचा फायदा उचलत मागच्या सामन्या प्रमाणेच ३०० धावांची वेस ओलांडली. पहिल्या डावात निर्धारित ५० षटकांत भारताने ६ बाद ३३६ धावा उभारल्या. पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न इंग्लंडची टीम करेल. हा सामना जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडच्या सलामीवीरांची विकेट लवकर मिळवावी लागेल.