लॉकडाऊनची मानसिकता ठेवा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. या बैठकीत रेमडेसिव्हीर इंडजेक्सनबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन १४०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विकले जाणार नाहीत असं राजेश टोपेंनी सांगितलं. शिवाय लॉकडाऊन बाबतही बोलताना टोपे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केली. सगळ्यांनी लॉकडाऊनची गरज असल्याचं सांगितलं. पण हातावरती पोट असणाऱ्यांंचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या मदतीच्या अनुषंगाने काही गोष्टी कराव्या लागतील. अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करुन याबाबत निर्णय घेतील. लॉकडाऊनसाठी तयारी आणि त्यानंतरचा परिणाम याबाबत चर्चा सुरु आहे असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात ऑक्सिजन बेड वाढवा, बेड वाढवा, डॉक्टर, नर्सेसची संख्या वाढवा, पैसे दिले आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन १५ दिवसात दुप्पट होणार आहे. लॉकडाऊनची तारीख आणि वेळ निश्चित सांगता येत नसली तरीही लॉकडाऊन ही काळाची गरज आहे आणि ते नक्की केलं जाणार आहे त्यामुळे त्यानुसार जनतेनं मानसिकता ठेवावी असंही टोपे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.