नंदा खरे लिखित: कापूस कोंड्याची गोष्ट

अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

नुकत्याच जाहीर झालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या घोषणेने ‘नंदा खरे’ यांचे नाव चर्चेत आले. पुरस्कारानंतर पुस्तक आणि साहित्यिक प्रकाश झोतात येणे ही खरंतर शोकांतिकाच. वास्तविक पाहता नंदा खरेंना या शासकीय शाबासक्यांची गरज असण्याचे कारण नाहीच आणि त्यांची ते यापूर्वीच घोषीत केलेले आहे. तरीही या निमित्ताने पुन्हा एकदा नंदा खरेंची सचोटी, व्यासंग यांचा उहापोह झाला हे बरेच.

पेशाने अभियंते असणारे खरे व्यवसाय निवृत्तीनंतर आजचा सुधाकर या मासिकाच्या संपादक मंडळात, तसेच मराठी विज्ञान परिषदेत सक्रिय होते. १९९० पासून २०१८ पर्यंत त्यांची अनेक पुस्तके, भाषांतरे प्रकाशित झाली. त्यात अंताजीची बखर, ‘बखर अनंतकाळाची’, ‘सांप्रति’, ‘उद्या’ आदि कादंबऱ्या, ‘इंडिका’-(भारतीय उपखंडाचा नैसर्गिक इतिहास), ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ आदी अनुवाद, ‘ऐवजी’ सारखे आत्मचरित्र लिहिणारे नंदा खरे भविष्याकडे ज्या जबाबदारीने पाहतात, वर्तमान ज्या परखडते जोखून बघतात आणि भूताचे स्मरण काय अफाट व्यासंगाने करतात ते बघून अंर्तमुख व्हायला होते.

ब्रिटीश वसाहती धोरणांमुळे वऱ्हाडतील शेती, पर्यावरण, पशुधन यांच्यावर झालेल्या परिणामांचा अभ्यास डॉ. लक्ष्मण डी सत्या यांनी पेन्सिलव्हॅनिया विद्यापीठात पीएचडीच्या शोधनिबंध स्वरूपात केला. वासाहातिक आकलनापलीक जातून संसाधनांनी ‘सुपीक’ असलेला हा प्रदेश अभाव आणि दुष्काळाच्या दुष्टचक्रात कसा अडकला? शेतजमीन आणि चराऊ कुरणे यांच्यात कोणते बदल झाले? शेणखत, चारा, सरपण, जमिनीचा दर्जा, सायीचे रोग या साऱ्यांचा अभ्यास अशा प्रश्नांमधून होणे किती गरजेचे आहे. आणि रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये म्हणून, रोगाचे ‘योग्य’ निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. याच भूमिकेतून नंदा खरेंनी हा शोधनिबंध अनुवादित केलेला आहे. ज्ञाननिर्मितीच्या आणि वितरणाच्या क्षेत्रात अशा परस्परपूरक व्यसंगांचे महत्त्व अनन्य आहे.

वसाहतवादी भांडवल आणि तंत्रज्ञान एकत्रपणे वऱ्हाडाची निसर्ग संपत्ती ओरबाडू लागले. यात साम्राज्यवादी शासनाची भूमिका काय होती? इथपासून ते भारताच्या निकृष्ट विषुववृत्तीय वातावरणावर, इथल्या लोकांच्या निकृष्ट कृषितंत्रावर खापर फोडणाऱ्या विश्लेषणांना छेद हा शोधनिबंध तत्कालिन वास्तवाचे एक तटस्थ आकलन आपल्यासमोर मांडतो.

डॉ. सत्या प्रत्येक प्रकरणात संदर्भासहित तपशीलांचे विवरण करतात. पहिल्या प्रकरणात ‘वसातवाद आणि पर्यावरणीय पार्श्वभूमी’, दुसऱ्यात ‘ब्रिटीश वसाहतवाद सुदृढ होण्याआधी वऱ्हाडातील पाणी व्यवस्थापन कसे होते आणि नंतर कसे झाल’, तिसऱ्यात ‘जमिनीचे व्यवस्थापन, कृषी आणि पशुधन यांचा एकमेकांशी असलेल्या आणि उत्तरार्धात अधोगतीकडे गेलेला संबंध’, चौथ्या प्रकरणात ‘ अवर्षण, दुष्काळ, रोगराई, मृत्यू या घटकांची वसाहतवादाचा परिणाम म्हणून चर्चा’ आणि शेवटच्या प्रकरणात ‘पशुधनाचा वाढलेल्या मृत्यूदरासंबंधाने शासकीय अहवाल आणि स्थानिक लोकांचा प्रतिसाद’ अशी विस्तृत चर्चा आलेली आहे.

संबंधित विश्लेषणावरुन वाचक म्हणून ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतात, त्यामध्ये वसाहतवादी अंमलाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महसूल पाठवण्यापलीडे स्थानिक समस्यांचा अजिबात गांभीर्याने विचार केला नाहीच शिवाय साम्राज्यवादी शक्तीने जे जे केले त्या सगळ्यांना प्रगती म्हटले आणि औद्योगिकदृष्ट्या, तुलनेने आपण मागास असल्याने त्यांच्या धोरणांना स्थानिक समर्थन मिळत गेले. चराऊ राने, वनांचे पट्टे पध्दतशीररित्या संपवल्याने वऱ्हाड सर्व बाजूंनी दुर्भिक्ष्यात सापडत गेला. आणि कापसाची मुळे खोल जाऊन पाणी शोषून पिके वाढवितात या शास्त्रीय सत्याच्या अंगाने पुढे गेले असता. कापसाच्या अति-व्यापारीकरणामुळे भूगर्भ पाणी पातळी कमालीची खालावली. म्हणजे, आजच्या तारखेला दिसणाऱ्या समस्यांची मुळे या सर्व वासाहतिक साम्राज्यवादपर्यंत जातात.

निसर्ग, भूगोल आणि वातावरण आदी घटकांचा अनुभवाधारीत समजुदारपणाच्या आणि प्रयोगांच्या भरवशावर स्थानिकांनी एक परस्परावलांनाबी व्यवस्था निर्माण केली असताना वसाहतवादी धोरणांची परिणती या सगळ्यांच्या अंतरिम ऱ्हासात झाली. हा संपूर्ण नवीन तरीही संदर्भधारित लेखाजोखा आजही दिशादर्शक ठरतो आहे. इतके मूलगामी संशोधन आपल्यापर्यंत पोहचवणाऱ्या नंदा खरेनांही या निमित्ताने सत्यप्रसाराचे श्रेय जाते.


अजून लोकांपर्यंत पोहोचवा..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *