कंगनाला अश्रू अनावर…
मुंबई: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर आपली छाप सोडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अभिनयाची आणखी एक दमदार झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. एका कार्यक्रमात खुद्द कंगनानंच तिच्या आगामी ‘थलैवी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला. विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्तानं देशाच्या राजकीय पटलावर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दक्षिण भारतातील राजकीय गणितांचा अंदाज येणार आहे. शिवाय तिथल्या कलाविश्वाची गणितं, कलाकारांचं जगणं या साऱ्यावरही चित्रपटाच्या निमित्तानं प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
बॉलिवूडची शेरनी कंगना रनौत आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या आगामी ‘थलायवी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात कंगना जयललिताच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात जयललिता यांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री होण्याचा प्रवास दाखवला जाईल. ट्रेलर रिलीजच्या निमित्ताने स्वत:ला ‘बब्बर शेरनी’ म्हणवणारी कंगना रडल्यानंतर प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने दिग्दर्शक विजयचे कौतुक करताना अक्षरशः रडण्यास सुरुवात केली.
I call myself Babbar Sherni cause I never cry I never give anyone the privilege of making me cry, don’t remember when I cried last but today I cried and cried and cried and it feels so good #ThalaiviTrailer https://t.co/lfdXR321O0
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 23, 2021
कंगनाने ‘थलायवी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विजयचे कौतुक केले आणि म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्यात अशा व्यक्तीला कधीच भेटले नाही, ज्याला माझ्या प्रतिभेबद्दल गिल्ट वाटले नाही. मला आज सर्वांसमोर सांगायचे आहे की, विजय हा असा व्यक्ती आहे, ज्याने मला माझी प्रतिभा उंचावण्यास मदत केली. विशेषत: पुरुष अभिनेत्यांशी जसे हसत खेळत वागले जाते, तसे अभिनेत्रींशी कधीच वागले जात नाही. पण, सह अभिनेत्याशी कसे वागावे आणि सर्जनशील भागीदारी कशी दाखवावी, हे मी त्यांच्याकडून शिकले आहे.’
अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या जे. जयललिता यांचा थेट मुख्यमंत्री आणि देशाच्या राजकाराणातील महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व होण्यापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासात आलेली महत्त्वाची वळणं हे सारंकाही या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. कंगनाच्या अभिनयाची झलक पाहता, ही क्वीन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार असं म्हणायला हरकत नाही.