राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी उभे केले जम्बो कोविड सेंटर; ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा

पारनेर: राज्यात कोरोना बाधित झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात ऑक्सिजन, बेड, औषधांचा तुटवडा जाणवत आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जंबो कोविड सेंटर उभे केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय टळत आहे.
राज्यात कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे शरदचंद्र आरोग्य मंदिर (कोविड सेंटर) येथे १,१०० बेड्चे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. यापैकी १०० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. या कोविड सेंटरसाठी निलेश लंके यांनी तालुक्यातील नागरिकांना अन्नदान व विविध सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आतापर्यंत तालुक्यातून १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झाले आहेत. तालुक्यातील मुंगशी गावातील ग्रामस्थांकडून ५ टन धान्य व ५० हजार रुपये अशी मदत उपचार केंद्रात जमा करण्यात आली आहे. याशिवाय भाजीपाला, फळे, अंडी, किराणा, वाफ घेण्याची यंत्रे, कोमट पाण्यासाठी थर्मास अशा विविध वस्तूंची मदतही मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.
याच बरोबर कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा दोन जंबो कोविड सेंटर उभे केले आहे. याबाबत रोहित पवार यांनी माहिती दिली असून ते म्हणाले,
कोरोनाच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी माझ्या मतदारसंघात #KJIDF च्या माध्यमातून अद्ययावत कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या माध्यमातून कर्जतला ३५० तर जामखेड ३०० अतिरिक्त बेड उपलब्ध झाले. यासाठी रात्रं-दिवस राबत असलेले अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार या सर्वांचे मनापासून आभार!