Sunday, September 25, 2022
Homeसंसदेच्या गॅलरीतूनदाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार...

दाऊदला दम भरणारा, ९० च्या दशकात अर्धा डझन पोलिसांच्या संरक्षणात फिरणारा पत्रकार…

फुटींना, बंडांना आणि सत्ता समीकरणाच्या धक्क्यांना तोंड देत शिवसेना टिकली, वाढत राहिली आणि तीनदा राज्याच्या सत्तेत आली. २०१२ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती आली. त्याआधी ६ वर्ष उद्धव ठाकरे राजकारणात पाय रोवून उभे होते.

बाळासाहेबांनंतर उध्दव ठाकरेंचा राजकीय आलेख चढता राहिला. दोनदा राज्यात सत्ता मिळाली. पण सध्या शिवसेनेला मोठी खिंडार पडल्याचं दिसतंय. शिवसेनेचे दिगगज नेते एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्याविरुध्द बंड केलंय. अनपेक्षितरित्या शिवसेनेचे बडे नेते उध्दव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील झालेत.

बड्या नेत्यांनी बंडाळी करून उध्दव ठाकरे यांना एकप्रकारे धक्काच दिलाय. अशातच काही नेते मात्र उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणे उभारले. त्यात प्रमुख नाव येते संजय राऊत यांचे. जग इकडचं तिकडं झालं, तरी हा माणूस उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही, असे बोलले जाते.

२०१९ नंतरच्या सत्तानाट्यानंतर संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका हीच शिवसेना आणि ठाकरे घराण्याची भूमिका असे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेचे पॉलिटिकल मॅनेजर, शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ, ठाकरे घराण्याची ढाल, सामनावीर अशा अनेक भूमिका संजय राऊत पार पाडत असतात.

पण कधीकाळी संजय राऊत ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करत असायचे.

कॉमर्सचा विद्यार्थी ते क्राईम रिपोर्टर

संजय राऊत यांचे शिक्षण मुंबईतील वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजमध्ये झाले. कॉमर्सची पदवी घेतल्यानंतर ते पत्रकारितेशी जोडले गेले. नवशक्ती व इंडियन एक्स्प्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांना लोकप्रभा या तत्कालीन प्रसिद्ध अशा साप्ताहिकात काम करण्याची संधी मिळाली.

कॉमर्सची पदवी घेतलेले संजय राऊत लोकप्रभाच्या माध्यमातून क्राईम रिपोर्टिंग करू लागले. यावेळी त्यांनी मुंबईतील गुन्हेगारीविषयी विपुल लिखाण केले. १९८० च्या काळात मुंबई संघटीत गुन्हेगारीमुळे हादरून गेली होती.

शहरावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक टोळ्या आपापसात संघर्ष करत होत्या. तसेच मुंबईतून गुन्हेगार विश्व संपविण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या कारवाया करण्यात येत होत्या. अशा काळात संजय राऊत यांनी क्राईम रिपोर्टिंग केलेली आहे.

लोकप्रभा ते सामना

क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत असताना संजय राऊत यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. मुंबईतील चांगला क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांनी नाव कमाविले. पण राऊत एवढ्यावरच थांबले नाही. क्राईम बीट हाताळून झाल्यानंतर पुढे ते राजकारणाकडे वळले.

क्राईम रिपोर्टर म्हणून काम करताना संजय राऊत यांनी अनेक सनसनाटी बातम्या कव्हर केल्याचे सांगितले जाते. नंतर राजकीय परिस्थितीवर राऊतांनी लिहायला सुरुवात केली, तेव्हा ते आक्रमक शैलीत आपली भूमिका मांडत.

त्याचवेळी संजय राऊत हे शिवसेनेच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका घेत असल्याचे बाळासाहेब ठाकरे यांना वाटले. त्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना थेट सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची ऑफर दिली.

सामना, बाळासाहेब आणि संजय राऊत

जेव्हा जेव्हा शिवसेनवर टीका व्हायची. तेव्हा बाळासाहेब देखील मार्मिकमधून टीकाकारांना अक्षरशः सोलून काढायचे. पण मार्मिक हे साप्ताहिक असल्यामुळे रोजच्या टीकेला उत्तर द्यायला आठवडा लागायचा.

त्यामुळेच बाळासाहेबांनी दैनिक सुरु करून शिवसेनेवर आलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी योजना आखली. त्यातूनचं सामना नावचं दैनिक जन्माला आलं. २३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्रीपासून शिवसेनेचे मुखपत्र सुरू झाले.

‘हिंदुत्वाचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी आणि दररोज होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी, सामना हे नवे शस्त्र असेल. आणि उद्या वेळ आली, तर खऱ्या शस्त्राला ही हात लावावा लागेल.’

असे म्हणत बाळासाहेबांनी सामनाच्या संपादकाची भूमिका निभावली. आपण ठाकरी भाषेतच लिहिणार असल्याचं जाहीर केले. आणि तिथूनच बाळासाहेबांनी अग्रलेखातून विरोधकांसह वारंवार टीका करणाऱ्याना पत्रकारांना शाब्दिक बाण मारत घायाळ करायला सुरुवात केली.

सामनाची सुरुवात झाली तेव्हा अशोक पडबिद्री कार्यकारी हे संपादक होते. पुढे संजय राऊत यांनी १९९३ पासून कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी पेलली.

बाळासाहेबांचे खासमखास संजय राऊत

जेमतेम २९ व्या वर्षी संजय राऊत सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर बाळासाहेबांप्रमाणेच ते कट्टर हिंदुत्वावादी विचार सामनातून मांडू लागले. अल्पावधीतच शिवसेनेची आक्रमक शैली सामनात झळकू लागली. त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी दैनिक म्हणून सामनाची जनमानसात स्वीकार्हता वाढली.

संजय राऊत यांना बाळासाहेबांची शैली अवगत झाल्याने व मुळातच राऊत हे आक्रमकपणे लिहित असल्याने सामनाच्या संपादकीयमधून मांडले जाणारे विचार हे बाळासाहेबच मांडत असल्याचे लोकांना वाटू लागले.

ज्या मार्मिक शैलीत बाळासाहेब विरोधाचे वस्त्रहरण करत तीच शैली अंगीकारून संजय राऊत यांनी सामनात लिखाण चालू ठेवले. त्यामुळे अल्पावधीतच ते बाळासाहेबांचे खासमखास बनले.

तसेच बाळासाहेबांच्या भाषेचा प्रभाव संजय राऊत यांच्यावर झाला. त्यामुळे एखाद्या विषयावर बाळासाहेब काय भूमिका घेतील, यावरून त्यांच्यासारखेच लिखाण राऊत करायचे, असेही सांगितले जाते.

सुरक्षा कवच आणि संजय राऊत

संजय राऊत यांच्या कार्यकाळात सामनात मुस्लीम विरोधी मजकूर प्रसिद्ध केला जाऊ लागल्याने त्यांच्या कारकिर्दीला वादाची किनार लागली.

एकदा संजय राऊत यांनी सामनात लिहिले की, जोपर्यंत मुस्लिमांचा वापर व्होट बँकेसाठी केला जाईल तोपर्यंत त्यांना कोणतेही भविष्य राहणार नाही. त्यामुळेच बाळासाहेबांची मागणी आहे की, मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायला हवा. हे लोक स्वताला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात त्यांचा चेहरा त्यानंतरच उघड होईल.

१९९२-९३ च्या धार्मिक दंगलीनंतर चौकशीसाठी नेमलेल्या बी. एन. श्री. कृष्णन यांच्या कमिशनने दिलेल्या अहवालानुसार हिंसक भाषा वापरून लोकांना उद्युक्त केल्याचा ठपका सामनावर ठेवण्यात आला होता.

कमिशनचे म्हणणे होते की, सामनातून प्रसिद्ध होणारे लेख आणि संपादकीय हे लोकांच्या धार्मिक भावना भडकीवणारे आणि द्वेषाने भरलेले आहे.

मुस्लिमविरोधी लिखाणामुळे सामनाविरोधात अब्रुनुकसानीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. यावेळी संजय राऊत यांच्याबरोबरच बाळासाहेबांना देखील दोषी ठरविण्यात आले होते.

कट्टर हिंदुत्ववादी विचार मांडू लागल्यानंतर अनेकांच्या निशाण्यावर संजय राऊत येऊ लागले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांना सरक्षण देण्यात आले होते.

जेष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित सांगतात, १९९० च्या दशकात संजय राऊत यांना सशस्त्र सुरक्षा दिली होती. अर्धा डझन पोलीसांच्या सरक्षण कवचात ते घराबाहेर पडत. सुरुवातीला राऊत हे मारुती ८०० या गाडीतून प्रवास करत असत. पण पुढे त्यांनी मारुती जिप्सी घेतली व पोलीस सुरक्षेत ते वावरू लागले.

सामनाच्या कार्यालयाला सुरक्षा

मुंबई क्राइम ब्रांच एका अधिकार्याने संजय राऊत एका gang च्या निशाण्यावर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सामनाच्या कार्यालयाला मुंबई पोलिसांनी सुरक्षा देऊ केली होती.

बांद्रा येथील मातोश्री बंगल्याला जेवढी सुरक्षा होती, तेवढीच सामनाच्या ऑफिसला पण होती. यावरून समजते, सामनातील लिखाणामुळे संजय राऊत यांचे किती शत्रू निर्माण झाले होते.

दाऊद इब्राहिमला दम भरणारा पत्रकार

२०१९ च्या सत्तानाट्यानंतर संजय राऊत प्रसिद्धीच्या शिखरावर होते. अशात लोकमतकडून त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. पुण्यातील टिळक स्मारक येथे दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आपण दाऊदला दम भरल्याचा खुलासा केला होता.

संजय राऊत म्हणाले, आता मुंबई अंडरवर्ल्ड राहिले नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अंडरवर्ल्ड काय होते, ते आम्ही पाहिलेले आहे. त्याकाळातील अंडरवर्ल्ड शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होते, हे आम्ही पाहिलेले आहे. त्या काळात गुंडांना भेटायला अख्ख्यं मंत्रालय खाली येत असत. मी दाउद इब्राहिमला पहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमही दिलाय.

सामना ऑफिस ते राज्यसभा

पत्रकार जितेंद्र दीक्षित म्हणतात, एक राजकीय पक्ष इथपासून ते कट्टर हिंदुत्ववादी संघटना ही प्रतिमा तयार करण्यामध्ये संजय राऊत यांची फार महत्वाची भूमिका आहे. अधिकाधिक अमराठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदीतून सामना पेपर काढायला हवा, असे आग्रहाने सांगणाऱ्या लोकांमध्ये संजय राऊत होते, असे जितेंद्र दीक्षित सांगतात.

पत्रकारितेसोबत राजकीय गुणवत्ता देखील राऊत यांच्याकडे असल्याचे बाळासाहेबांनी हेरले आणि त्यांना २००४ मध्ये राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. तोवर राऊत यांनी एकाही निवडणूक लढविली नव्हती.

त्यांनतर २०१० साली राऊत दुसऱ्यांदा राज्यसभेवर गेले. पुढे २०१६ ला तिसऱ्यांदा ते राज्यसभेवर नियुक्त झाले होते. १० जून २०२२ पासून त्यांची चौथी टर्म सुरु आहे.

राऊत यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिलाच उमेदवार सलग चार वेळा राज्यसभेवर निवडून गेला. तसेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर सलग चौथ्यांदा जाण्याचा मान त्यांना मिळाला आहे.

शिवसेनेचे ‘पॉलिटिकल मॅनेजर’

राजकारणातलं हरेक कसब माहिती असणारा एखादा तरी नेता प्रत्येक राजकीय पक्षात असतो. पक्षातला वरच्या फळीतला नेता म्हणून त्याला ओळखले जाते. राजकारणातले खाच-खळगे पचवत पक्षासाठी तो ‘ऑल राऊंडर’ची भूमिका पार पाडत असतो. अशा ऑल राऊंडर राजकीय नेत्यांना आजकाल ‘पॉलिटिकल मॅनेजर’ म्हटले जाते.

भारतीय राजकारणात अशा पॉलिटिकल मॅनेजर्सची कमी नाही. देशातल्या, राज्या-राज्यातल्या बहुतांश पक्षात असे पॉलिटिकल मॅनेजर आहेत.

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल, समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते अमर सिंग, राष्ट्रीय जनता दलाचे प्रेम चंद गुप्ता, बहुजन समाज पक्षाचे सतीश मिश्रा, आम आदमी पक्षाचे संजय सिंग आणि या पॉलिटिकल मॅनेजर्सची यादी ज्यांच्याविना अपूर्ण राहू शकते ते शिवसेनचे संजय राऊत.

शिवसेनेच्या १७ प्रमुख नेत्यांच्या यादीत संजय राऊत यांचेही नाव आहे. सामनातून शिवसेनेची भूमिका मांडत असतानाच ते राज्यसभेतही शिवसेनेचा आवाज बनण्याचे काम करतात.

दिल्ली दरबारी शिवसेनेची भूमिका तेच पुढे नेतात. संसदेत आणि संसदेच्या बाहेर संजय राऊत यांचा शब्द म्हणजेच शिवसेनेची भूमिका असते. संसदेतील सर्वपक्षीय, विरोधी पक्षांच्या बैठका असो की राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी चर्चा. संजय राऊत हेच शिवसेनेच्या वतीने प्रतिनिधित्व करत असतात.

संदर्भ – जितेंद्र दीक्षित, जेष्ठ पत्रकार

अधिक वाचा :

राज्यसभा निवडणूक : आणखी एक रेकॉर्ड संजय राऊतांच्या नावे झालाय!

जग इकडचं तिकडं झालं, तरी या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ कधी सोडली नाही…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments