भूखंडाच्या वादातून पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या, भाजप नेत्याचा प्राजक्त तनपुरेंवर गंभीर आरोप

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. रोहिदास दातीर यांची हत्या १८ एक भूखंड प्रकरणातून झाली असून या प्रकरणी राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा आणि मेव्हणा यांचा या भुखंडात मालकी आहे, त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे.
माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. राहुरी शहरातील १८ एकर भूखंड प्रकरणी दातीर हे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. शहरातील मोक्याच्या भूखंडांवर पहिले आरक्षण टाकले जाते. त्यानंतर त्या मालकी संपर्क करून जागेचा व्यवहार करायचा व आरक्षण उठवायचे असा काही सत्ताधाऱ्यांचा धंदा झाला आहे. राहुरी नगरपालिकेने मोक्याच्या १८ एकर जागेवर शैक्षणिक आरक्षण टाकले होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मुलगा सोहम या नावाने सोहम प्रापर्टीज, प्राजक्त तनपुरे यांचे मेव्हणा सुशीलकुमार देशमुख आणि या खुनातील आरोपी कान्हू मोरे याचा मुलगा यशवंत मोरे यांचीही या जागेत मालकी आहे.
या जागेपैकी मालक असलेले पठारे यांनी पॉवर ॲटर्नी करून पत्रकार दातीर यांना कायदेशीर लढण्याचा अधिकार सुपूर्द केला होता. दातीर यांनी या जागेबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
दातीर यांनी कान्हू मोरे याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या. आणि वेळोवेळी पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही पत्रकार रोहिदास दातीर यांनी केली होती. परंतु, त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
या जागेत डॉ बाबुराव बापूजी तनपुरे या संस्थेच्या नावाने यातील काही जागा आहे आणि याबसंस्थेचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे हे आहेत. यामुळे या गुन्ह्यातील आरोपींच्या मोबाईलचे रेकॉर्ड तपासल्यानंतर यातील बरेच सत्य बाहेर येणार आहे. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी आपण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असं शिवाजी कर्डिले यांनी सांगितले.
आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्या अडचणीत असलेले शिवसेनेचे मंत्री अनिल परब त्यांच्यानंतर आघाडीचे तिसरे मंत्री प्राजक्त तनपुरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.