रेखा जरे हत्याकांड-न्यायालयाकडून पत्रकार बाळ बोठे ‘फरार’ घोषित

रेखा जरे खून प्रकरणी पसार बाळ बोठे याला न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले आहे. ९ एप्रिलपर्यंत न्यायालयासमोर हजर व्हावेत, अन्यथा पुढील कारवाई करण्यात येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून करणाऱ्या पाच आरोपींविरोधात तपास अधिकारी अजित पाटील यांनी यापूर्वी १ हजार ५०० पानांचे दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात २६ फेब्रुवारीला दाखल केले आहे. जरे यांच्या खुनात सहभाग असणारा पत्रकार बाळ बोठे हा गेल्या ३ महिन्यापासून फरार आहे. याबाबत पारनेर न्यायालयासमोर सुनावणी झाली, यावेळी न्यायालयाने बाळ बोठे फरार घोषित केले आहे. जेव्हा बोठे हा अटक करण्यात येईल तेव्हा त्याचे स्वतंत्र पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे, फिरोज राजू शेख, आदित्य सुधाकर चोळके, सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार या पाच जणांविरोधात आरोपपत्र यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे .
पुणे महामार्गावरील जातेगाव शिवारात ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेखा जरे यांचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी त्यादिवशी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिरोज राजू शेख व ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे या दोघा आरोपींना जरे यांच्या खून प्रकरणात अटक केली. अटक केल्यानंतर त्यांनी आदित्य सुधाकर चोळके याने सुपारी दिल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी सागर उत्तम भिंगारदिवे व ऋषिकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना कोल्हापूरमधून अटक केली होती.
पत्रकार बाळ बोठे याने भिंगारदिवे याच्यासह संगनमत करूनच चोळके याला मयत जरे यांच्या खूनची सुपारी दिल्याची कबुली भिंगारदिवे याने दिलेली आहे. यानंतर पसार झालेल्या बोठे याचा शोध पोलिस अद्यापही घेत आहेत. मयत जरे यांचा खून करण्यासाठी धारदार चाकू वापरण्यात आला होता. जरे यांचा खून करण्यासाठी वापरलेले शस्त्र नेमके कोणते होते. याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते. पोलिसांच्या तपासात ते हत्यार चाकू असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून तो चाकू जप्त केला आहे. पसार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केल्या केल्यानंतरच घटनेतील खरे कारण पुढे येणार आहे. यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यातील सर्वांचेच रेखा जरे खून प्रकरणीकडे लागले आहे.