जसप्रीत बुमराह ‘पुण्याच्या’ मुलीसोबत लग्नबंधनात!
मुंबई: भारतीय संघातील जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्न करणार अशी चर्चा सगळीकडे रंगली होती. तो कुणाशी लग्न करणार याबाबत सुद्धा बराच सस्पेंस होता. या सगळ्या चर्चेच्या, अफवांच्या गदारोळात दक्षिण चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिचं नाव पुढे आलं. जसप्रीत बुमराहने यासंबंधीची माहिती लपवल्याचं कळतंय कारण तो जिच्याशी लग्न करणार होता ती व्यक्ती अनुपमा परमेश्वरन नसून पुण्याची संजना गणेशन आहे.
टीव्ही अँकर आणि प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी बुमराहने लग्नगाठ बांधली आहे. गोव्यातील एका सुरेख ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.कोरोनाच्या धर्तीवर संजना आणि जसप्रीत या दोघांच्याही कुटुंबातून ठराविक मंडळींचीच या विवाहसोहळ्यासाठी उपस्थिती होती. लग्नसोहळ्यामध्ये मोबाईल वापरांबाबत काही निर्बंध आहेत. आपल्या जीवनातील या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर लीक होऊ नयेत यासाठी दोघांनी विवाहस्थळी मोबाईल वापरास बंदीचा आग्रह धरल्याचं कळत आहे.
संजना गणेशन हिचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला होता. तिने पुण्यातून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. संजना गणेशनला पहिल्यांदा २०१२ मध्ये ‘स्प्लिट्सविला ७’ मध्ये स्पर्धक म्हणून लोकप्रियता मिळाली. परंतु एका दुखापतीमुळे तिचा कार्यक्रमातील प्रवास संपला. संजना टीव्ही प्रेंझेंटर बनण्याआधी एक मॉडेल होती. तिने ‘फेमिना ऑफिशिअली गॉर्जिअस’ ॲवॉर्ड जिंकला. तसेच तिने ‘२०२१ फेमिना स्टाईल दिवा’ फॅशन शो मध्येही भाग घेतला होता. २०१४ मध्ये संजनाचे मॉडेलिंग करिअर खूप चांगले सुरू होतं. ती ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात देखील होती.
तिला २०१९ साली क्रिकेट विश्वकप दरम्यान स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉंईट’ आणि ‘चिकी सिंगल्स’ हे कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. संजना प्रीमिअर बॅडमिंटन लीग (पीबीएल) ची होस्ट होती. त्यामुळे तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. संजनाने स्टार स्पोर्ट्सचा ‘दिल से इंडिया’ या कार्यक्रमाचा एक सेगमेंट देखील होस्ट केला होता. इतकंच काय तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम सुद्धा काम केले आहे. संजनाचे आयपीएल टीम केकेआर सोबत चांगले संबंध आहेत. ती केकेआरच्या फॅन्ससाठी ‘द नाइट क्लब’ नावाच्या एका विशेष चर्चासत्राच्या कार्यक्रमाची होस्ट देखील होती.