‘जय श्रीराम!’ म्हणत अक्षयकुमार करणार ‘राम सेतु’ ची सुरवात
मुंबई: ‘ही दिवाळी म्हणजे भारत राष्ट्राचा आदर्श आणि भगवान श्रीरामाची महान स्मृती, येणाऱ्या युगांपर्यंत भारतीय संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. चला सगळ्या पिढ्यांना रामाशी जोडूया. या प्रयत्नात आमचा एक छोटासा संकल्पही आहे, ‘राम सेतु’, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’असं लिहीत अक्षय कुमारने ‘राम सेतु’ या आपल्या आगामी चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं होतं. सोशल मीडियावर याची बरीच चर्चा होत होती.
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार हा सध्या आपल्या परिवारासह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कामातून ब्रेक घेत अक्षय मालदीवमध्ये सुट्टी साजरा करत आहे. अक्षय गेल्या काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अलिकडे ‘बच्चन पांडे’चे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आता तो ‘राम सेतु’मध्ये व्यस्त होणार आहे. अक्षय लवकरच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे. अक्षय कुमार आयोध्येत रामलल्लाची भेट देऊन या चित्रपटाची सुरूवात करणार आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल ५’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.
अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘राम सेतु’मध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्यांदाच या अभिनेत्री अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. निर्माते साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. राम सेतुचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा आणि निर्मिती डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केली आहे. १८ मार्च रोजी अक्षय, दिग्दर्शक आणि निर्मात्यासमवेत चित्रपटाच्या मुहूर्त शूटसाठी अयोध्येत जाणार आहे. भगवान राम यांचा आशीर्वाद घेऊन अक्षय चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.