‘मी कधी कुणाचे पाय चाटले नाहीत’, हांजी-हांजी करून तुम्हाला हे सगळे मिळाले; खडसे यांचा गिरीश महाजन यांना टोला

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांचे वाकयुद्ध सुरु आहे. एका कथित ऑडिओ क्लिपवरून वाद सुरु झाला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केला असल्याचं बोललं जात आहे. या ऑडिओ क्लिपवरुन गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. जो माणूस मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाही. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर देताना खडसे यांनी महाजन यांच्यावर पलटवार केला आहे.
महाजन यांच्यावर टीका करताना खडसे म्हणाले की, ‘गिरीशभाऊला मीच राजकारणात आणलंय, मी आर्थिक मदत केलीय, प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरलोय. म्हणून ते आज याठिकाणी दिसत आहेत. माझा दोष एवढाच आहे की, मी कधी कुणाचे पाय चाटले नाहीत, कुणाची हांजीहांजी केली नाही, ती मला सवयही नाही. आपण अनेकांना घडवतो, अनेक लोकं प्रामाणिक राहतात. ‘
एकनाथ खडसेंनी भाजपला सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात सतत राजकीय वाद होत आहेत. जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून एक ऑडिओ क्लीप प्रसारित होत आहे. यावरून आता खडसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत.