कार्यक्षम मुख्यमंत्री १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतील अशी अपेक्षा

पुणे : देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत असतांना केंद्र सरकारने लसीकरणा बाबत निर्णय घेतला आहे. १८ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी सरकारने केली आहे. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस मिळण्याची सुरुवात होणार आहे. उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी मोठी घोषणा केली असून १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. याबाबत महाराष्ट्राचे ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करतील, अशी तमाम महाराष्ट्राला अपेक्षा आहे असे मत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी फेसबुक पोस्ट केली असून उत्तरप्रदेश, आसाम राज्या प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा १८ वर्षावरील सर्वांना मोफत लसीचा निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर
“उत्तरप्रदेश आणि आसाम राज्यांनी १८ वर्षावरील सर्वांसाठी मोफत लसीकरण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ‘महाराष्ट्र कधी थांबलाय ना कधी थांबणार’ याच भूमिकेतून आणि आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी सुचवल्याप्रमाणे मा. मुख्यमंत्री ‘लॅाकडाऊन’ हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडतील आणि आज संध्याकाळी आपले ‘कार्यक्षम’ मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हमधून १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करतील, अशी तमाम महाराष्ट्राला अपेक्षा आहे” असे मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले आहे.
१८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण उत्तर प्रदेश सरकार मोफत करणार आहे. पण जवळपास २० कोटी लोकसंख्या असलेलं राज्य हा निर्णय घेतं हे विशेष.. महाराष्ट्र काय करणार? असा प्रश्न सुद्धा नागरिक सोशल मिडीयावर विचारत आहेत.