पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजिक, भुजबळांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार!

नाशिक : पश्चिम बंगालच्या निकालानंतर भाजप आणि इतर पक्षांच्या नेत्यांमध्ये तू तू-मै मै सुरू झाली आहे. छगन भुजबळ यांच्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘तुम्ही जामिनावर आहात, जोरात बोलू नका, महागात पडेल’ असं म्हटलं होतं. तसंच छगन भुजबळांच्या जामिनासाठी समीर भुजबळ तासन् तास बंगल्यात बसत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे.
‘समीर भुजबळला माझ्याआधी अटक झाली होती, मग तो माझ्या जामिनासाठी यांच्याकडे कसा जाईल, असं म्हणत भुजबळांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला. सीबीआय, ईडी यांचा राजकीय उपयोग होतो हे माहिती होतं, पण आता न्यायदेवतापण त्यांच्या हातात आहे का?’ असा मला प्रश्न पडल्याचं भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्ला चढवला. ‘ मला महागात पडेल असा इशारा देता, सीबीआय-ईडीसारखी यंत्रणा यांच्या ताब्यात आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ममता दीदी झाशीच्या राणी सारख्या एक हाती लढल्या. ‘मैं मेरा बंगाल नही दुंगी असं ममतांनी सांगितलं, या माझ्या बोलण्यावर रागावण्यासारखं काय आहे ‘ असं भुजबळ म्हणाले. तसंच ‘पराभवाची देखील सवय करून घ्यायला पाहिजे, कारण आता वारंवार हे फटके बसणार, तुम्ही किती लोकांवर रागावणार’ असा टोलाही भुजबळांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणं सहाजिक आहे. त्यामुळंच वड्याचं तेल वांग्यावर अशी स्थिती असल्याचं भुजबळ म्हणाले.
सीबीआयनं पुनावालांना धमकी देणाऱ्यांना शोधावं’
सीबीआय, आयबी यांनी इतर कामं सोडून पुनावाला यांना कोणी धमक्या दिल्या हे शोधून काढायला हवं. तसंच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करून पुन्हा लस निर्मिती सुरू करावी. पुनावाला यांच्या तक्रारीची दखल कोणी घ्यायची हा देखिल प्रश्न असून लस उत्पादनावर याचा परिणाम होण्याची भीती भुजबळांनी बोलून दाखवली.