संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का?
मुंबई: काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीबाब एक मोठं वक्तव्य केलं होतं. संयुक्त पुरोगामी आघाडीचे पुनर्गठन करण्याची आवश्यकता आहे. यूपीएचे नेतृत्व बदलून ज्या नेत्याला विरोधक स्वीकारतील अशा नेत्याच्या हाती द्यावे असे सूचवताना या आघाडीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना द्यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
संजय राऊतांच्या याच वक्तव्यावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले आणि काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. ते आज मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काँग्रेसचे नेते याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. मुळात शिवसेना यूपीएचा भागच नाही. मग त्यांना याबाबत चर्चा करण्याचा किंवा मत नोंदवण्याचा अधिकारच नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर दिल्लीतील काँग्रेसचे नेतेही नाराज झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.