आयपीएलची आज पहिली मॅच; RCB विरुद्ध MI! जाणून घ्या काय आहे संघांची खासियत

चेन्नई: फक्त भारतीय क्रिकेट नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या आयपीएल च्या नव्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. आयपीएलचा गेला हंगाम फक्त ५ महिन्यांपूर्वी झाला होता. कोरोनामुळे २०२०चा हंगाम उशिरा झाला होता. IPL २०२० स्पर्धा नोव्हेंबर मध्ये युएईत खेळवण्यात आली होती. तेव्हा मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले.
आयपीएलच्या यंदाच्या म्हणजेच १४व्या हंगामाची सुरूवात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (MI vs RCB) यांच्यात चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर होत आहे. बेंगळुरू संघाचे नेतृत्व विराट कोहली तर मुंबईचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. हे दोघेही खेळाडू भारतीय संघात कर्णधार आणि उपकर्णधार या भूमिकेत असतात. आता आयपीएलमध्ये रोहित विक्रमी सहावे आणि विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी तर विराट पहिल्या जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत २७ लढती झाल्या आहेत. यापैकी १७ लढतीत मुंबईने तर १० लढतीत बेंगळुरूने बाजी मारली आहे.
रोहित शर्माची ऑल राऊंडर ब्लू आर्मी –
मुंबईच्या संघात अनुभवी आणि विस्फोटक खेळाडूंचा भरणा आहे. तसंच संघातील सगळे खेळा़डू एकाचढ एक फॉर्ममध्ये आहे. या फलंदाजांना रोखायचं कसं, असा प्रश्न बंगळुरु संघाला नक्की पडला असेल. मुंबईचे सलामीवार कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉक सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघांना फोडून काढण्यास नेहमीच सज्ज असतात. तसंच सलामीचा फलंदाज म्हणून मुंबईकडे क्रिस लिनचा देखील पर्याय असणार आहे. तसंत सूर्यकुमार यादव आणि इशान किशनला रोखायचं मोठं आव्हान बंगळुरुसमोर असणार आहे. तसंच पांड्या ब्रदर्स देखील ऐन फॉर्मात आहेत. पोलार्डची बॅट देखील बोलतीय. एकूणच मुंबईची बॅटिंग लाईनअप तगडी आहे.
दुसरीकडे बोलिंगबाबतही मुंबईचा संघ आघाडीवर आहे. यॉर्ककर किंग जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट यांच्यासारखे दोन जागतिक दर्जाचे बोलर मुंबईजवळ आहेत जे कोणत्याही क्षणी मॅच पलटवू शकतात तसंच कुल्टर नाईलचा देखील मुंबईच्या संघात समावेश आहे. अनुभवी पीयुष चावला आणि राहुल चाहरच्या फिरकीने मुंबईच्या बोलिंगला एक वेगळीच धार चढली आहे.
विराटची विस्फोटक चॅलेंजर्स बंगळुरु –
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात बंगळुरुची टीम विस्फोटक वाटतीय. देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहलीच्या रुपाने बंगळुरुकडे आक्रमक सलामी जोडी आहे जी जो़डी जगातल्या क्लास बोलर्सचा समाचार घेण्यास सज्ज आहे. संघात ए बी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे हिटर आहेत जे जगातल्या कोणत्याही बोलर्सचे बॉल स्टेडियमच्या बाहेर पाठवण्यास सक्षम आहेत. त्यांचा दिवस असला की ते प्रतिस्पर्धी संघाच्या चिंधड्या उडवल्याशिवाय राहत नाही. न्यूझीलंडच्या फीन एलेनचा देखील संघात समावेश करण्यात आलेला आहे.
रजत पाटीदार, मोहम्मद, काइल जमैसिन आणि क्रिस्टियनच्या रुपाने चांगल्या अष्टपैलू खेळाडूंचा भरणा बंगळुरु संघात आहे. बोलिंगमध्ये केन रिचर्डसन, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, ॲडम झॅम्पा यांसारखे टी ट्वेन्टी स्पेशालिस्ट बोलर्स बंगळुरुच्या संघात आहेत.
क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये रोहित शर्मा हा धमाकेदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. विराटला भलेही विजेतेपद मिळाले नसेल पण कर्णधार आणि फलंदाज म्हणून त्याने मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे या पहिल्या लढतीत विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
केव्हा, कधी आणि कुठे पाहाल सामना –
मुंबई आणि बेंगळुरू यांच्यातील सामना आज (९ एप्रिल) संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. या सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि हॅटस्टारवर पाहता येईल. भारतीय वेळेनुसार सामना ठीक ७.३० वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.