कलाकारांची चौकशी करा पण त्यांना लगेच गुन्हेगार ठरवू नका: संजय राऊत

मुंबई: कलाकार, दिग्दर्शक शेतकऱ्यांना पाठींबा देतात, जेएनयुच्या आंदोलनाला पाठींबा देतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून बोलतात. सोशल मिडीयावर व्यक्त होणाऱ्या काही मोजक्या कलाकारांवर धाडी पडत असल्याने लोकांच्या मनात शंका आणि संशयाला जागा राहते असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
दिग्दर्शक अनुराग कश्यप, मधु मंटेना, विकास भल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यावर आयकर विभागाने छापे मारले. या कारवाई वर बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारचे नाव न घेता टिका केली.
सध्या प्रत्येक जण दडपणाखाली आहे. ते दडपण न बोलण्याचं, ‘गप्प राहण्याचं’ आहे. कधी अंडरवर्ल्ड मधून पैसा येते, काळा पैसा वापरल्याची चर्चा होते ते चुकीचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चित्रपट उद्योगाचा पाया दादासाहेब फाळके या मराठी माणसाने रोवला. आणि त्या उद्योगामध्ये अशा कोणत्याही गोष्टीला थारा असू नये. जेंव्हा या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली. तेव्हा सिने उद्योगातील प्रमुख लोकांनी आवाज उठवल्याचे मी अनेकदा पाहिले आहे. चौकशी जरूर व्हावी पण त्यांना अशा प्रकारे लगेच गुन्हेगार ठरवू नये असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
कुठेतरी गडबड असल्याशिवाय आयकर विभाग धाड टाकत नाही. पण कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली?, असा सवाल करत शिवसेनेने मोदी सरकारला धारेवर धरले.
मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे अनेकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले काहीजण तर मोदी सरकारचे लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय?, असा सवालही शिवसेनेकडून विचारण्यात आला. दिग्दर्शक अनुराग कश्यप, मधु मंटेना, विकास भल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यावर कर चुकाविल्याचा आरोप करून ३ मार्चला त्यांच्या घर, ऑफिसवर आयकर विभागाने छापे मारले. फँटम फिल्म कंपनीने जो पैसा कमावला त्याची योग्य माहिती दिली नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.