लसीकरणा बाबत महाराष्ट्रासोबत दुजाभाव; राजेश टोपे यांनी दिली आकडेवारी

मुंबई: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य शासनावर गंभीर आरोप केले होते. आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांनी यावेळी सगळी आकडेवारी मांडत राज्याला लसीचा पुरवठा कमी पाठविण्यात येत असल्याचा पुन्हा एकदा त्यांनी सांगितले.
राजेश टोपे म्हणाले, आताच्या माहितीनुसार राज्याला एक आठवड्याला फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहे. उत्तर प्रदेशला ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसीचे वाटप करण्यात आले आहे. याबाबत मी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्ती करण्याच आश्वासन दिले आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहत आहोत. अस राजेश टोपे यांनी सांगितले. त्याच बरोबर त्यांनी राज्यातील रुग्णाची संख्या आणि लसीचे डोस याबाबत माहिती दिली.
बुधवारी डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्रात आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांच्या संखे बाबत चिंता व्यक्त करत महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेवर ताशेरे ओढले होते. यांच्या आरोपावर राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.
टोपे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार आहे एकून बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असतांना केवळ ७.५ लाख लसी का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. सर्व पद्धतीने केंद्राशी समन्वय ठेवला जात आहे. ७ दिवसात ४० लाख लसीचे डोस लागतात. त्यामुळे आठवड्याला ४० आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवे. तरच राज्यातील लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरु राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काही ठिकाणी लसीकरण बंद सातारा, सांगली, पनवेल, येथील लसीकरन बंद पडले आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. आपण लसीकरण केंद्र वाढविण्याची गरज आहे. हर्षवर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये कि त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला केवळ ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.