कोरोनाच्या लढ्यात भारतीय सैन्य दल सज्ज; निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत बोलावणार

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलाची मदत घेतली जाणार आहे. यामध्ये भारतीय सैन्य दल आपल्या निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेसाठी रुजू करणार आहे. यामुळे देशातील आरोग्य व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा हातभार लागणार आहे. दरम्यान सैन्याच्या तिन्ही दलांमधून मागील दोन वर्षात जे वैद्यकीय कर्मचारी निवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा सेवेत रुजू केले जाणार असल्याची माहिती केंद्र सरकारव्दारे देण्यात आली आहे.
याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी सांगितली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत बोलावण्याचा निर्णय आम्ही घेतला असून देशातील कोरोनाची स्थिती हाताळण्यासाठी तयारी आणि कार्यक्रम सुरु केला आहे. यामध्ये गेल्या दोन वर्षात जे वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा वैद्यकीय आपत्कालीन सेवेत काम करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच भारतीय सैन्य दलाकडे जे ऑक्सिजन सिलेंडर्स उपलब्ध आहेत ते देशातील विविध रुग्णालयांना पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान रुग्णालयांमध्ये नर्सिंग कर्मचाऱ्यांना देखील बोलाविण्यात येईल व नागरिकांना गरज पडल्यास मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार असल्याची माहिती जनरल बिपीन रावत यांनी दिली आहे.